Narayan Rane On Sanjay Raut: “बाळासाहेबांबद्दल बोलायची संजय राऊतांची लायकी नाही, पद, पैशांसाठी आलेत”: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:39 PM2022-02-16T18:39:21+5:302022-02-16T18:40:50+5:30
Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊत आतापर्यंत शेतकऱ्यांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्या पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलायची संजय राऊत यांची लायकी नाही. फक्त पद आणि पैसे कमवण्यासाठी ते आलेत, या शब्दांत राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
बाळासाहेबांबद्दल बोललेले मी कधी ऐकून घेतले नाही. लोकप्रभामध्ये काम करताना संजय राऊत झोळी घेऊन फिरायचे. लोकप्रभात असताना, उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचे सोडले नव्हते, आता म्हणतायत की, बाळासाहेब आणि उद्धव यांचे आशीर्वाद मला मिळतायत, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.
आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, पक्षासाठी ५ पैसे तरी दिले का?
एका बाजूला पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना. त्यांना माहिती होते की, आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कोण नाही, आधी बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली. शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी संजय राऊत आले. आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, पक्षासाठी ५ पैसे तरी दिले का, अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.
दरम्यान, संजय राऊत आतापर्यंत शेतकरी प्रश्न, राज्यातील मुद्द्यांवर बोलताना दिसले नाहीत. विकासावर बोला, ते बोलत नाही. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली. राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, यावर काहीतरी बोला. राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचे आंदोलन सुरु आहे. पण काही नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी निशाणा साधला.