मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. भाजप महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढत आहे. काल ही यात्रा नागपूर येथे झाली. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी राहुल गांधी यांचे आभार मानत टोला लगावला.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "वीर सावरकरांचा अपमान केल्याने त्यांची उंची कमी झाली नाही, तर त्यांना घरोघरी जाण्याची संधी दिली. सत्य आणि सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आभार मानतो. राहुल गांधींनी ते पुढे चालू ठेवावे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीका केली."राहुल गांधी म्हणतात की मी माफी मागणार नाही, ते सावरकर नाहीत. तुम्ही सावरकर किंवा गांधीही होऊ शकत नाही. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमान कारागृहात त्यांना खोलीत बंदिस्त करण्यात आले होते. पूर्ण अंधार होता. त्यांना त्यांची रोजची कामेही तिथं करायला लावली होती. राहुल गांधी, एक रात्र त्या खोलीत राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला एसी देऊ, पण तुम्हाला राहता येणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.
भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान
तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथून ‘वीर सावरकर गौरव यात्रे’ला सुरुवात केली. सावरकरांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गेल्या महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा काढण्याची घोषणा केली होती.