'ओबीसी आरक्षाणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे'; भागवत कराड यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:53 PM2022-07-20T18:53:02+5:302022-07-20T18:55:02+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Union Minister of State Bhagwat Karad said that credit for OBC reservation should be given to Deputy CM Devendra Fadnavis. | 'ओबीसी आरक्षाणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे'; भागवत कराड यांचं मत

'ओबीसी आरक्षाणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे'; भागवत कराड यांचं मत

Next

मुंबई- ओबीसी समाजासाठी एक चांगली बातमी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाने बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला आरक्षण दिलं म्हणून आनंदाचं वातावरण आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे, असं भागवत कराड म्हणाले. 

तसेच काही ठिकाणी ओबीसीशिवाय इतर जाती जिथं जास्त आहे तिथे ओबीसी आरक्षण कमी झालं आहे. याची कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वेक्षण व्हावं, ओबीसींचा नेमका आकडा किती आणि आरक्षण किती? यावर परत एकदा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेण्याची गरज असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलं. 

जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये २७ टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टानं हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. राज्यात ९२ महानगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकी संदर्भातील कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याच्याही सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कोंडी फुटल्याचं म्हटलं जात आहे. 

बांठिया आयोगाच्या अहवालात नेमकं काय दडलंय?

बांठिया आयोगाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देताना लोकसंख्येच्या प्रमाणात ते देण्यात यावे असे आयोगाने म्हटले आहे. ओबीसी राजकीय आरक्षण देताना ५० टक्के मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाला धक्का न लावता ५० टक्के मर्यादेत ओबीसी आरक्षण द्यावे, अशी शिफारस बांठिया आयोगाने केली आहे. बांठिया आयोगाने हा अहवाल राज्य सरकारकडे ७ जुलै रोजी सादर केला होता. 

Web Title: Union Minister of State Bhagwat Karad said that credit for OBC reservation should be given to Deputy CM Devendra Fadnavis.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.