‘परळ टर्मिनस’ प्रवाशांसाठी सज्ज, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 06:27 PM2019-03-03T18:27:08+5:302019-03-03T18:47:34+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते परळ टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई - परळ हे कॉर्पोरेट हब आणि अनेक रुग्णालय असलेले ठिकाण आहे. दादरप्रमाणे परळ टर्मिनस हे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाला जोडलेले आहे. यासह बँका, फुलबाजार मोठ्या संख्येने असल्याने परळ स्थानकाचे रूपांतर प्रशस्त अशा ‘परळ टर्मिनस’मध्ये करण्यात आले असून, परळ टर्मिनसचे लोकार्पण रविवारी (3 मार्च) करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते परळ टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते डोंबिवली १५ डब्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. नवीन रेल्वे रूळ टाकून कल्याणकडे जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे. फलाट क्रमांक २ अ ही टर्मिनस मार्गिका आणि फलाट क्रमांक ३ चे रुंदीकरण केले आहे. दोन्ही फलाटावर संरक्षित छत टाकले आहे. १२ मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम जोडणारे पादचारी पूल, सरकते जिने आदी सुविधा प्रवाशांसाठी येथे उपलब्ध आहेत. परळ टर्मिनस पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोपे होईल. परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८.३८ मिनिटांनी चालविण्यात येईल. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.१५ वाजता सुटणार आहे.
परळ टर्मिनससह कुर्ला, सायन, दिवा, गुरुतेग बहाद्दुर नगर, महालक्ष्मी, पालघर येथील पादचारी पुलांचे उद्घाटन करण्यात आले आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ, बदलापूर स्टेशनवरील सुधारणा, सरकत्या जिन्यांचे उद्घाटनही करण्यात आले. यासह पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचेही उद्घाटन केले. मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सुरत-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस, वलसाड-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-सुरत फ्लाइंग राणी एक्स्प्रेस, लोणावळा, इगतपुरी स्थानकांचा पुनर्र्विकास, नेरळ-माथेरान गाडीचे विस्टाडोम डबे यांचेही लोकार्पण करण्यात आले आहे.