मालाड येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते अनावरण
By मनोहर कुंभेजकर | Published: October 6, 2024 07:30 PM2024-10-06T19:30:35+5:302024-10-06T19:30:52+5:30
मालाड पश्चिम,पी उत्तर महानगरपालिका विभाग कार्यालया समोर, लिबर्टी गार्डन येथे सावरकर चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे.
मुंबई-भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले. मालाड पश्चिम,पी उत्तर महानगरपालिका विभाग कार्यालया समोर, लिबर्टी गार्डन येथे सावरकर चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे.
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी , श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारतमातेचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशासाठी केलेले महान कार्य आणि अतुलनीय योगदान यावर प्रकाश टाकला. परदेशातूनही आपल्या लेखणीतून आणि मासिकांतून राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित ठेवणारे ते पहिले मराठी पत्रकार असल्याचे ते म्हणाले. सावरकरांचे देशाप्रतीचे बलिदान आणि समर्पण आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या युवकांचे आदर्श आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलेल्या सावरकरजींचे त्याग, समर्पण, योगदान आणि बलिदान आपल्या भावी पिढ्यांनी स्मरणात ठेवण्यासारखे आहे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या धारदार लेखणीने राष्ट्रवादाची विचारधारा त्या काळी देशवासियांच्या हृदयात रुजवली होती आणि आजही सावरकरजींचे दूरदर्शी विचार, त्यांचा वारसा आणि विचार युवकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्यरत आहेत.