येत्या गणपतीत बोरिवलीवरून कोकणासाठी रेल्वे सुरू करणार- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

By मनोहर कुंभेजकर | Published: June 13, 2024 05:56 PM2024-06-13T17:56:59+5:302024-06-13T17:57:27+5:30

मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत या घोषणेचे जोरदार स्वागत केले.

Union Minister Piyush Goyal will start the train from Borivali to Konkan on Ganpati | येत्या गणपतीत बोरिवलीवरून कोकणासाठी रेल्वे सुरू करणार- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

येत्या गणपतीत बोरिवलीवरून कोकणासाठी रेल्वे सुरू करणार- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

मनोहर कुंभेजकर, मुंबई-बोरिवली वरून कोकणासाठी रेल्वे सुरू करण्याची उत्तर मुंबईतील कोकणवासियांची मागणी आहे.त्यामुळे याबाबत मी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली असून येत्या गणपतीत बोरिवली वरून कोकणासाठी रेल्वे सुरू करण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल रात्री कांदिवलीत केली.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत या घोषणेचे जोरदार स्वागत केले.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मध्ये उत्तर मुंबईचे  खासदार पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. उत्तर मुंबईतून ३,५७,६०८ विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर काल रात्री कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मध्ये त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यां बरोबर पहिला सार्वजनिक संवाद कार्यक्रम दिमाखात पार पडला.

उत्तर मुंबईतील महायुतीचा विक्रमी विजय आणि  पियुष गोयल यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येचा  दुग्ध शर्करा योग साधत  उत्तर मुंबई भाजप जिल्हा वतीने प्रभू श्री रामाची मूर्ती आणि पुष्पमाला देऊन केंद्रीय मंत्री गोयल यांचा दिमाखदार सत्कार करण्यात आला.

यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि गोराईच्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीत आपल्या दालनात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची लवकर बैठक घेणार आहेउत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

निवणुक प्रचारात महायुतीच्या सर्वांचे सहकार्य अत्यंत मोलाचे राहिले आहे.कार्यकर्त्यांनी आपल्या विक्रमी विजयासाठी खूप मेहनत घेतली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घरा घरात पोहचवले.तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो अशी साद घालत त्यांनी सर्वांचे  मनापासून आभार व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुढे म्हणाले की, मी जास्त वेळ मतदार संघात राहणार आहे.प्रत्येक काम हे काही खासदार करू शकत नाही,त्यासाठी संघटन मजबूत करून पदाधिकारी, कार्यकर्ते,माजी नगरसेवक यांना काम केले पाहिजे. कार्यकर्ते तयार केले पाहिजेत बूथ कार्यकर्ते हे नेते असून  येणाऱ्या काळात बूथ कार्यकर्ते यांनी आपापल्या बूथचे नेतृत्व करत मोठे व्हायचे आहे असे आवाहन त्यांनी केले. विधानपरिषदेच्या आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व सहा विधानसभा मतदार संघातून आणि पालिकेत उत्तर मुंबई तून ४२ नगरसेवक  निवडणून आणण्यासाठी कंबर कसून मेहनत करा असे आवाहन त्यांनी केले.

माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की,१९९२ ते २०२४ पर्यंत तीन वेळा नगरसेवक,दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलो. कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी साथ दिली. नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वेळप्रसंगी प्रशासनाशी संघर्ष केला.पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे काम करत राहणार आहे.सर्व समाजाला एकत्र येवून काम करायला पाहिजे असे सांगत आगामी निवडणूकीत उत्तर मुंबईच्या सर्व जागा निवडून आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी,विधानपरिषदेचे गटनेते आ.प्रवीण दरेकर, आ.अतुल भातखळकर, विपस. भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे,उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्र संचालन सरचिटणीस निखिल व्यास यांनी केले.
 

Web Title: Union Minister Piyush Goyal will start the train from Borivali to Konkan on Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई