मुंबई- ठाकरे आणि शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसंच ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह मिळालं आहे.
ऋतुजा लटकेंवर शिंदे गटाचा दबाव, राजीनामा मुद्दाम रखडवला; ठाकरे गटाची कोर्टात धाव!
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार, असं रामदास आठवले म्हणाले. आज त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. रामदास आठवले यांनी यावेळी भाजपाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. भाजपाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेकडून स्विकारण्यात आलेला नसल्यानं ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून राजीनाम्यावर निर्णय घेणं टाळलं जात असल्याचा आरोप करत ठाकरे गट आता थेट कोर्टात पोहोचला आहे. ठाकरे गटाकडून मुंबई हायकोर्टात याबद्दलची याचिका दाखल करण्यात आली असून उद्या यावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच, CM शिंदेंना भेटले नाही; ऋतुजा लटकेंनी स्पष्टचं सांगितलं!
महापालिका आयुक्तांची आज भेट घेण्याआधी ऋतुजा लटके यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात ऋतुजा लटके यांनी आपण ठाकरेंचेच निष्ठावंत शिवसैनिक असून आपल्यावर कोणताही दबाव नाही असं स्पष्ट केलं आहे. तसंच अंधेरीची पोटनिवडणूक 'मशाल' चिन्हावरच लढणार असल्याचंही ऋतुजा लटके यांनी सांगितलं. माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसंच मला कोणतीही ऑफर नाही, असं ऋतुजा लटके यांनी सांगितलं.
मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि मी निवडणूक मशाल चिन्हावरच लढणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी राजीनामा मंजूर होण्यासाठी पालिका कार्यालयात येत आहे. तुमची सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. फक्त सही बाकी आहे असं सांगण्यात येत आहे. आज मी महापालिका आयुक्तांना भेटत आहे. त्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकेल, असं ऋतुजा लटके म्हणाल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"