Join us  

अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार...; रामदास आठवलेंनी खास शैलीत घेतला मविआचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 12:02 PM

भाजपाला जातीयवादी ठरवून चुकीचे राजकारण करणे हे शरद पवारांचे धोरण योग्य नाही. त्यामुळे अजित पवार यांनी महाबंड केले असं रामदास आठवले म्हणाले.

मुंबई – “आमच्यासोबत आल्यामुळे अजित पवार, नक्कीच होणार आहे महाविकास आघाडीची हार, अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार म्हणूनच महाविकास आघाडीत होणार आहे हार” अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आहे. आज सकाळी आठवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीनंतर रामदास आठवले पत्रकारांना म्हणाले की, अजित पवारांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारक आहे. हा निर्णय २०१४ मध्ये घ्यायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला तेव्हा राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यावेळी भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आली असती तर महाराष्ट्राच्या विकासात फार मोठी भर पडली असती. २०१७ मध्येही राष्ट्रवादीने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण शिवसेना नको असं पवारांनी भूमिका घेतली. तर शिवसेनेशिवाय सत्ता नको असं भाजपाने म्हटलं होते. शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपासोबत जाण्याचं सांगितले होते. मी शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत कायम राहिलो होतो. मी अजित पवार यांना शुभेच्छा देतो. ते आमच्यासोबत आले आहेत. अजित पवारांसोबत जवळपास ४५ आमदार येतील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत ही पूर्वीची भाजपा राहिली नाही. सबका साथ, सबका विकास हा भाजपाचा नारा आहे. नरेंद्र मोदी बारामतीत आले तेव्हा त्यांनी अजितदादांच्या विकासकामांचे कौतुक केले. भाजपाला जातीयवादी ठरवून चुकीचे राजकारण करणे हे शरद पवारांचे धोरण योग्य नाही. त्यामुळे अजित पवार यांनी महाबंड केले. अजित पवारांसारखा भक्कम नेता आमच्यासोबत आलेला आहे त्यामुळे आमची ताकद आहे. आरपीआय छोटा पक्ष असला तरी राज्यात ताकद आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान मिळाले. हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही सांगितले आहे अशी माहिती आठवलेंनी दिली.

शिवसेनेत कुठलीही नाराजी नाही

शिवसेनेचे जे आमदार, खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत त्यांची बैठक झाली. एकनाथ शिंदे यांना विचारूनच अजित पवारांना मंत्रिमंडळात घेतले. अजित पवार आल्याने ताकद वाढलीय त्यामुळे नाराजी नाही. शिवसेनेत कुठलीही नाराजी नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे पुढेही मुख्यमंत्री राहणार आहेत असं भाजपाने स्पष्ट केले. शिंदेंनी धमक दाखवून आमच्यासोबत आले त्यामुळे सरकार आले. त्यांना बदलणार नाही. शिवसेनेत नाराजी नाही हे त्यांनीही स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :रामदास आठवलेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडी