'राजेशाही आता संपली आहे'; रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:50 PM2022-07-27T16:50:59+5:302022-07-27T16:51:12+5:30
उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
मुंबई- बंडखोरांना बाळासाहेब ठाकरे हवे आहेत. त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. माझं आव्हान आहे की, हे नातं तोडून दाखवा. माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. माझे वडील का चोरताय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही पुत्र असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर आमचाच हक्क आहे. इतरांनी ती कोणी लावू नये असे कोणाला म्हणता येणार नाही, असं म्हणत राजेशाही आता संपली आहे, असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचं नाही, तर देशाचं नेतृत्व आहेत. या देशातल्या कुठल्याही नागरिकाला बाळासाहेबांचं नाव घेऊन जय-जयकार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही नाव घेण्यापासून अडवण्याचं कारण नाही, असं शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी स्वत: कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे. त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास ही फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱ्याखोऱ्या छान फुलांची बहरून जातात. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौदर्यं दिसलं नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो पण हे काय आपल्या मातीसाठी करणार? असा सवाल त्यांनी केला.
मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना....
सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही. पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.