Join us

Video: अजून काही 'आठवले' तर सांगतो; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 5:49 PM

एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) देखील उपस्थित होते. 

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. 

रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात राज्याची कोणती कामं असतील काही मागण्या असतील तर सांगा मी त्या केंद्रापर्यंत पोहोचवून कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करतो, असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्याकडे दोन महत्वाच्या मागण्या करत मोदी सरकारवर निशाणा साधला.  

रामदास आठवले मला आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की केंद्राकडून काही मदत हवी असल्यास कळवा. माझा रामदास आठवलेंना एवढीच विनंती आहे की तुम्ही केंद्रात आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा मोदींनी केवळ गुजरातचा दौरा केला आणि तातडीनं १ हजार कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात ते का आले नाहीत? हे अद्याप काही कळालेलं नाही. गुजरातला १ हजार कोटी दिलेत. महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा", असं अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.

अजित पवार यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. उद्धव यांनी रामदास आठवले यांना केंद्रातून मदत मिळवून देण्याचे आवाहन केली. मुख्यमंत्री म्हणाले, 'रामदास आठवले माझे शेजारी आहेत. आपण राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देऊ असे आठवले म्हणत आहेत. त्यांनी ही मदत करावीच, पण अजूनही काही 'आठवले' तर आणखी सांगतो. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज-

पश्चिम द्रूतगती महामार्गावर कांदीवलीजवळ मेट्रो चाचणीचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री वांद्रे येथील एमएमआरडीएच्या सभागृहाकडे यायला निघाले त्यावेळी रस्त्यावरील दिसलेल्या ट्राफिकवर त्यांनी बोट ठेवलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात यावर भाष्य केलं. मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.

टॅग्स :उद्धव ठाकरेरामदास आठवलेमेट्रोकेंद्र सरकारअजित पवारमहाराष्ट्र सरकारजीएसटी