रत्नागिरीच्या अनन्याची कलाकृती बनली 'नव भारत साक्षरता' कार्यक्रमाची ओळख; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अनन्याच्या चित्राची दखल
By रेश्मा शिवडेकर | Published: December 26, 2023 03:07 PM2023-12-26T15:07:30+5:302023-12-26T15:08:22+5:30
तिने रेखाटलेले संकल्पचित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विट करत तसेच उल्लास या नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून तिची प्रशंसा केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या अशिक्षित वयोवृद्ध आजी-आजोबांसाठी स्वयंसेवक बनून त्यांची शिकण्याची इच्छापुर्ती करत असलेल्या रत्नागिरी येथील दहावीतल्या अनन्या चव्हाण हिच्या प्रेरणादायी कलाकृतीची दखल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतली आहे. तिने रेखाटलेले संकल्पचित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विट करत तसेच उल्लास या नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून तिची प्रशंसा केली आहे.
अनन्याला गोदुताई जांभेकर या आपल्या शाळेत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्याकडून नव भारत साक्षरता मोहिमेची माहिती मिळाली. तिने आपले अशिक्षित आजी आजोबा या दोघांना शिकविण्याचा निर्धार केला. वेळ मिळेल तसे ती त्यांना साक्षरतेचे धडे देऊ लागली. त्याचबरोबर आजी-आजोबांना शिकवतानाचे आपले स्केच तिने पाटीवर रेखाटले. तिच्या या कलाकृतीची दखल सर्वांनी घ्यावी, तसेच आपापल्या असाक्षर कुटुंबीयांना शिक्षित करण्यासाठी इतरांनीही प्रेरणा घ्यावी म्हणून तिचे कलाशिक्षक अनिल सागवेकर यांनी हे चित्र तिला वर्गातील फलकावर काढावयास सांगितले. तिने साकारलेले रेखाचित्र हळूहळू शाळेत आणि राज्यभर व्हायरल झाले. रत्नागिरी डायटचे अधिव्याख्याता तथा या मोहिमेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र लठ्ठे यांनी हे छायाचित्र राज्य योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना पाठवले. त्यांनी ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयास पाठवले असता दिल्लीनेही तिच्या कलाकृतीची दखल घेऊन सर्वांसाठी ते ट्विटर व फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.
चित्र नेमके काय?
उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कुटुंबातील निरक्षरांना घरातील शिक्षित सदस्यांनी वेळ देऊन साक्षर करणे अभिप्रेत आहे. नेमकी हीच बाब सार रूपाने या कलाकृतीतून अनन्याने दर्शविली आहे. 'चला भारत घडवू या' असे शीर्षक देऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तिने काढलेले संकल्पचित्र ट्विट केले आहे. या योजनेत केंद्राने दखल घेतलेली राज्यातील ही तिसरी कलाकृती आहे.
साक्षरता अभियानाविषयी
८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनापासून राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. यात शाळांनी सर्व्हे करून निरक्षर शोधणे, स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांना साक्षर बनवणे अपेक्षित आहे. राज्यात काही अंशी साक्षरता वर्ग सुरू आहेत.
कलाकृतींची दाखल
यापुर्वी चिंचणी (सातारा) येथील ७६वर्षीय बबई मस्कर या महिलेच्या साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाच्या छायाचित्राची आणि बारामती (पुणे) येथील ७२वर्षीय सुशीला व ९वर्षीय रुचिता क्षीरसागर या आजींना नातीच्या प्रेरणादायी छायाचित्रांचीही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेऊन ती छायाचित्रे उल्लास फेसबुक पेजवर पोस्ट केली आहेत. राज्यानेही नवभारत साक्षरता अभियानात त्यांचा प्रचारासाठी वापर सुरू केला आहे.
"कुटुंबातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शिक्षित सदस्यांनी त्यांची लगतच्या शाळेकडे ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन योजना विभागाचे शिक्षण संचालक डाॅ.महेश पालकर यांनी केले आहे.