मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैनची 'गरूडझेप', गोदी कामगाराचा मुलगा झाला मोठा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:29 PM2023-05-26T12:29:37+5:302023-05-26T12:30:24+5:30

hussain sayyed upsc : मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैन सय्यदनं गरिबीला चीतपट करत UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले. 

Union Public Service Commission declared UPSC Result 2022 in which Hussain Sayyed, who lives in the slums of Mumbai, secured 570th rank  | मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैनची 'गरूडझेप', गोदी कामगाराचा मुलगा झाला मोठा अधिकारी

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैनची 'गरूडझेप', गोदी कामगाराचा मुलगा झाला मोठा अधिकारी

googlenewsNext

मुंबई : 'ज्यांच्या पंखात बळ असते, ते आकाशाची उंची गाठू शकतात' या ओळी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहम्मद हुसैन सय्यदला (Hussain Syed) बरोबर लागू पडतात. गरिबीला आव्हान देत, संकटांना चीतपट करत मोहम्मदने UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवलं. मुंबईच्या वाडी बंदर परिसरात डीमेलो रोडवरील झोपडपट्टीत राहणाऱ्या या तरूणानं नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये ५७० रॅंक मिळवून तरूणांसमोर एक आदर्श ठेवला. तर अशिक्षित आई-वडिलांना आपल्या लेकाचं यश पाहून आनंदाअश्रू आले. 

यूपीएससी परिक्षेत बाजी मारणारा २७ वर्षीय हुसैन सय्यद आपल्या परिसरातील तरूणांसाठी रोल मॉडेल अर्थात आदर्श बनला आहे. गोदी कामगाराच्या मुलाची ही 'गरूडझेप' पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. हुसैनचे वडील रमजान इस्माईल सय्यद हे इंदिरा डॉक येथील लोडिंग आणि अनलोडिंग विभागात गोदी कामगार म्हणून काम करतात. मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा यासाठी हुसैनच्या वडिलांनी आपल्या मुलाला खंबीरपणे साथ दिली. 

पाचव्या प्रयत्नात मिळालं यश
गरिबीला चीतपट करून आई-वडिलांचं नाव मोठं करण्याच्या इराद्याने UPSC च्या आखाड्यात उतरलेल्या हुसैनला चारवेळा अपयश आले. पण हिम्मत न हारता त्यानं आपल्या संघर्षाची लढाई सुरूच ठेवली. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याला पाचव्या प्रयत्नात यश मिळालं. हुसैन सय्यदनं उमरखाडी येथील सेंट जोसेफ शाळेतून एसएससी आणि सीएसटी उत्तीर्ण केले. अंजुमन-ए-इस्लाममधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एलफिंस्टन कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून त्यानं पदवी घेतली.

कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नागरी सेवा परिक्षेबद्दल माहिती देखील नसलेल्या हुसैननं निकाल लागल्यानंतर आनंद व्यक्त केला. "माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी नागरी सेवांसाठी प्रयत्न करावे. पण कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी याबद्दल ऐकलेही नव्हते, परंतु मी ठरवलं अन् तेव्हापासून ते माझे स्वप्न बनले", असं त्यानं सांगितलं. घवघवीत यशानंतर सर्वच स्तरातून हुसैनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

वडिलांना आनंदाअश्रू 
आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेलं लेकरू आज मोठा अधिकारी झाला हे पाहून हुसैनच्या वडिलांना आनंदाअश्रू आले. हुसैन हा त्याच्या चार भावडांपैकी सर्वात लहान आहे. त्याला दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. "हुसैन अभ्यासात मेहनती होता आणि त्यानं मोठा अधिकारी व्हावं अशी त्याचीही इच्छा होती. यासाठी जे काही करता आलं ते मी केलं. खरं तर त्याची मेहनत आणि देवाचा आशीर्वाद यामुळं त्याला हे यश मिळालं", असं हुसैनच्या वडिलांनी सांगितलं. ते टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्थिक परिस्थिती बिकट पण जिद्द कायम
हुसैन सय्यदचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असे. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याची जाणीव हुसैनला होती. म्हणून नागरी सेवेची परिक्षा दिल्यानंतर काही महिने त्यानं कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायचे काम केले. यामुळे त्याला आर्थिक मदत झाली असल्याचे हुसैनने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे त्याला आयपीएस किंवा आयआरएस पद मिळण्याची आशा आहे, परंतु रॅंक सुधारण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याचा त्याचा मानस आहे. "मी आणखी एक प्रयत्न करेन आणि माझी रॅंक सुधारण्याचा प्रयत्न करेन. आयएएस अधिकारी होण्याचं माझं स्वप्न आहे आणि माझ्याकडे अजून एक संधी आहे", असं हुसैननं अधिक सांगितलं.  

  
 

Web Title: Union Public Service Commission declared UPSC Result 2022 in which Hussain Sayyed, who lives in the slums of Mumbai, secured 570th rank 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.