Join us

केंद्रीय नौकानयनमंत्र्यांनी मुंबई बंदरातील प्रकल्पांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:09 AM

मुंबई : केंद्रीय नौकानयनमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी मुंबई पोर्ट ट्रस्टला भेट देऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. देशांतर्गत पर्यटकांना ...

मुंबई : केंद्रीय नौकानयनमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी मुंबई पोर्ट ट्रस्टला भेट देऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. देशांतर्गत पर्यटकांना गोव्याला जाण्यासाठी क्रूझ सेवा देणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या देशांतर्गत क्रूझ टर्मिनलवरील पायाभूत सुविधा आणि आगामी प्रकल्पांची पाहणी त्यांनी केली.

मुंबई बंदरात नव्याने बांधण्यात आलेल्या ५व्या तेल धक्क्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटी यांनी मंत्र्यांना माहिती दिली. २२ एमएमटीपी क्षमता असलेला हा देशातील सर्वांत मोठा तेल धक्का असून, पूर्ण भरलेली सुएझ मॅक्स जहाजे आणि अंशतः भरलेल्या व्हीएलसीसी म्हणजेच सर्वांत मोठ्या क्रूड वाहकाला पुरवठा करण्याची क्षमता त्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असून, त्याचे राष्ट्रार्पण अद्याप बाकी आहे. बंदरामध्ये प्रस्तावित आणि चालू असलेल्या इतर प्रकल्पांबाबतही मंत्र्यांना माहिती देण्यात आली.

.........

पोर्ट ट्रस्टचे कौतुक

पाचव्या तेलाच्या धक्क्याच्या बांधकामामुळे दुहेरी हाताळणी टळली असून, आतापर्यंत २०० कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या कार्यकारी संचालकांनी दिली. मुंबई मेट्रोच्या बांधकाम साहित्याचा वापर भराव घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मंत्र्यांनी कौतुक केले. शिवाय त्यांनी पाचव्या तेल धक्क्यावर असलेल्या ‘नॉर्डेक मून’ सुएझ मॅक्स टँकरला भेट दिली आणि जहाजाच्या चालकाशी संवाद साधला. देशांतर्गत क्रूझ टर्मिनल, ऑफशोर कंटेनर टर्मिनल, लॉक गेट, ड्राय डॉक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनललाही भेट दिल्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.