मुंबई : वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाविषयी जनजागृती करण्यासाठी एलिफंट फॅमिली आणि गुडअर्थ यांच्या सहयोगाने, एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन कुलाबा येथील गेट वे आॅफ इंडिया येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी आणि खासदार व एलिफंट परेडच्या दूत पूनम महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हाती कुंचला घेऊन या हत्तींच्या शिल्पावर रंगरंगोटी केली.या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘हेल्प द हाथी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील तीन आठवड्यांमध्ये मुंबईत विविध ठिकाणी रंगीबेरंगी हत्तींचे कळप पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन पुढील ३ आठवडे मुंबईच्या विविध भागांमध्ये फिरेल. या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून हत्तींच्या शिल्पकृती साकारून जंगल वाचविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी साकारलेल्या १०१ हत्तींच्या शिल्पकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून, भारतातील हत्तींचे १०१ जाण्या-येण्याचे मार्ग नमूद करण्यात आले होते. हे मार्ग हत्तींसाठी सुरक्षित व्हावेत, यासाठी वाइल्ड लाइफ ट्रस्टच्या माध्यमातून एलिफंट फॅमिली प्रयत्न करत आहे.ही शिल्पे अमिताभ बच्चन, एल. एन. तल्लूर, सब्यसाची मुखर्जी, मसाबा गुप्ता आदींनी साकारली आहेत. या रंगीत हत्तींना पाहायला येणारे रसिक त्यांच्यासोबत छान फोटो काढण्याची संधीही मिळणार आहे. मुंबईपूर्वी हे प्रदर्शन कोलकाता, जयपूर, नवी दिल्ली येथे लोकांमध्ये जंगल, हत्ती आणि जंगली प्राण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
‘हेल्प द हाथी’ कलेच्या माध्यमातून अनोखी मोहीम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:43 AM