लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकेकाळी पत्र हे दूरसंवादाचे एकमेव माध्यम होते. कालपरत्वे संवाद माध्यमांचे जाळे विस्तारत गेले आणि पत्र संस्कृती लोप पावली. पण संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा काळाच्या पडद्याआड जाऊ न देण्याच्या उद्देशाने ‘वर्डालय’ या संस्थेने खुल्या पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी १० ऑगस्ट २०२१ पूर्वी पत्र पाठविणे आवश्यक आहे.
पत्रातील मजकूर विषयानुरूप असावा, पत्रलेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही एकाच भाषेत असावे, पत्र टायपिंग फॉरमॅटमध्येच असणे अनिवार्य आहे.
पत्र पाठविताना स्वतःचे पूर्ण नाव, वय, ठिकाण, ई-मेल पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे, ग्रंथ आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. प्रथम क्रमांकास १ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७०० रुपये आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्यास ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्याशिवाय वाचकांच्या पहिल्या पसंतीच्या पत्रास १००० रुपये रोख, ग्रंथ व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
.....
पत्रलेखनाचे विषय-
‘पावसाला पत्र’, ‘महापुरुषाला पत्र’, ‘नकार दिलेल्या प्रियकर/प्रेयसीला पत्र’, ‘विठ्ठलाला पत्र’, ‘वृद्धाश्रमातून आपल्या मुलाला पत्र’, तुम्हाला आवडत्या कोणत्याही विषयाला पत्र यापैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहून विहित मुदतीत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.