लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन वेळीच उपलब्ध होणे हे फार महत्त्वाचे आहे. या कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी वर्सोव्यात ‘ऑक्सिजन बँक’ ही अनोखी संकल्पना राबविण्यात येत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवेसेनेचे वर्सोवा विधानसभा संघटक शैलेश फणसे यांनी आतापर्यंत १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेेटर मशीन मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
शिवसेना प्रणीत महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे वांद्रे ते जोगेश्वरीत सुमारे २००० सदस्य आहेत. त्यांना शैलेश फणसे यांच्या आझाद नगर येथील कार्यालयात युनियनचे सहचिटणीस प्रशांत घोलप आणि विश्वास तेली, कृष्णा ठोंबरे, प्रफुल भगत यांच्या टीमकडे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन मोफत दिले, तर वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक ५८, ६०, ६३ तसेच मिल्लत नगर फेडरेशन, वेसावे येथील सामाजिक सन्मान संस्था, यारी रोड मुस्लिम समाज, आझाद नगर उत्सव समिती, लोकांची शक्ती अशा विविध संस्थांना आतापर्यंत १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन मोफत दिली आहेत. अजून १५ मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.