- मनोहर कुंभेजकर
मुंबई: कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन वेळीच उपलब्ध होणे हे फार महत्वाचे आहे.मुंबई सह राज्यात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्री मंडळातील सर्व सहकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेतला.परराज्यातून रेल्वेने ऑक्सिजन राज्यात आणला गेला होता. मात्र कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.त्यांची ही संकल्पना दिंडोशी विधानसभा मतदार संघातील आठ प्रभागात युवासेनेच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू यांनी केला आहे.
शिवसेना युवासेना दिंडोशी विधानसभा व शुभारंभ फाउंडेशनच्या वतीने या ऑक्सिजन बँक मोहिमेचा शुभारंभ काल सायंकाळी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभु यांच्या हस्ते त्यांच्या गोरेगाव पूर्व आरे चेक नाक्या समोरील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. या ऑक्सिजन बँकेच्या संकल्पने बद्धल लोकमतला अधिक माहिती देतांना अंकीत प्रभू म्हणाले की,कोविड रुग्ण घरी असतांना त्याची ऑक्सिजन पातळी ही कमी जास्त होत असते.त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी दिंडोशी युवा सेनेच्या माध्यमातून दिंडोधी विधानसभेतील प्रत्येक प्रभागात आम्ही "ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत उपलब्ध करून दिले आहे. यासाठी युवासेनेची 24 जणांची टीम डॉक्टर आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली गरजू कोविड रुग्णांनी येथील युवा सेनेच्या टीमशी संपर्क साधल्यावर त्यांना त्वरित घरपोच "ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन" उपलब्ध करून दिले जाईल.
सदर मशीन कसे ऑपरेट करायचे याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. कोविड रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्यावर त्यांच्या घरून "ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन" घेऊन येतील. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करे पर्यंत त्यांची खाली येणारी ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.