मराठी शाळेसाठी अनोखा संघर्ष

By admin | Published: May 1, 2016 02:26 AM2016-05-01T02:26:22+5:302016-05-01T02:26:22+5:30

मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकून भविष्य नसल्याचा पद्धशीरपणे होत जाणारा प्रचार आणि इंग्रजी शाळांच्या मार्केटिंग तंत्राची मध्यम व उच्च मध्यमवर्गाला पडलेली भुरळ यामुळे

Unique Conflict for Marathi School | मराठी शाळेसाठी अनोखा संघर्ष

मराठी शाळेसाठी अनोखा संघर्ष

Next

मुंबई : मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकून भविष्य नसल्याचा पद्धशीरपणे होत जाणारा प्रचार आणि इंग्रजी शाळांच्या मार्केटिंग तंत्राची मध्यम व उच्च मध्यमवर्गाला पडलेली भुरळ यामुळे आता मराठी शाळांकडे कोणी ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. मात्र अशा परिस्थितीतही मराठी माध्यमांच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलने मराठीचे व्रत जोपासले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मायमराठी’साठी झटणाऱ्या या संस्थेचा आदर्श राज्यातील शाळांकरिता प्रेरणादायी आहे.
काळाच्या ओघात मराठी माध्यमांच्या शाळा एकामागोमाग एक बंद होत असताना अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या संस्थेची वैशिष्ट्ये मात्र सातत्याने वाढत आहेत. इंग्रजी माध्यमातील काही मुलेही माध्यम बदलून या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आकृष्ट झाली आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी वाढत असलेले आकर्षण पालकांमध्ये घर करून बसले असताना २०१५ साली तब्बल ४०८ विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश घेतला. या संस्थेत शैक्षणिक अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला जातो. त्यात ई-लर्निंग, चित्रपतंग दृश्यकलावर्ग, क्रीडा उपक्रम अकादमी, अंकुर निसर्ग मंडळ, फंक्शनल इंग्रजी, स्पोकन इंग्रजी, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा अशा विविध प्रकारच्या नवनव्या विषयांशी निगडित उपक्रम राबविले जातात. गेली अनेक वर्षे या शाळेचा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागतो व आतापर्यंत गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. दहावीच्या पूर्वतयारीसाठी १० दिवसांचे अभ्यास शिबिर ही संकल्पना सुरू करून गेली ५५ वर्षे सातत्याने राबविणारी राज्यातील एकमेव शाळा आहे. (प्रतिनिधी)

मराठी शाळांकडे मराठी जनांनीच फिरवलेली पाठ इथपासून ते इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांतून मिळणाऱ्या सुविधा अशा अनेक घटकांचा फटका मराठी शाळांना बसला असून याची परिणती मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या कमी होण्यात आणि बंद पडण्यात झाली आहे. परंतु, या सर्व आव्हानांचा बारकाईने विचार करत इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तोडीस तोड किंबहुना त्याहीपेक्षा अधिक अशा अद्ययावत शिक्षण सुविधा या शाळेमार्फत देत आहोत. राज्यातील अन्य शाळांनीही या शाळेचे मॉडेल राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कृती समितीच्या सहयोगाने यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी सरकारने अशा शाळा, संस्थांना मदत करावी, अशी मागणी आहे.
- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, शिव शिक्षण संस्था

Web Title: Unique Conflict for Marathi School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.