आयात शुल्कातून सूट मिळविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:02+5:302021-07-18T04:06:02+5:30

२५ कोटींची करचोरी; राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे मागवल्या महागड्या गाड्या लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयात शुल्कातून सूट मिळविण्यासाठी राजनैतिक ...

Unique fight to get relief from import duty | आयात शुल्कातून सूट मिळविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

आयात शुल्कातून सूट मिळविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

Next

२५ कोटींची करचोरी; राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे मागवल्या महागड्या गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयात शुल्कातून सूट मिळविण्यासाठी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे गाड्यांची तस्करी करणाऱ्या टोळीला महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत या टोळीने अशा प्रकारे २० गाड्यांची तस्करी केली असून, तब्बल २५ कोटी रुपयांचा कर चुकविल्याची माहिती समोर आली आहे.

परदेशी वकिलातीत काम करणारे राजदूत, राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशातून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची आयात केल्यास सीमा शुल्कात सूट दिली जाते. इतरांना मात्र निर्धारित शुल्क भरावे लागते. परदेशातून महागड्या गाड्यांची आयात करावयाची असल्यास एकूण किमतीच्या तब्बल २०४ टक्के आयात कर द्यावा लागतो. शिवाय त्यावर २८ टक्के जीएसटी आणि १२.५० टक्के सरचार्ज आकारला जातो. हा कर चुकविल्यास मोठा फायदा लाटण्याची संधी हेरून या टोळीने अनोखी शक्कल लढविली. त्यानुसार राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे गाड्या मागवून करचुकवेगिरीचा सपाटा लावला.

सीमा शुल्कात सवलत मिळविणाऱ्या गाड्यांच्या आयातीचे प्रमाण वाढल्याने डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे देशभरातील सात राज्यांत ऑपरेशन ‘मोन्टे कार्लो’ राबविण्यात आले. एका राजनैतिक अधिकाऱ्याच्या नावाने मागविलेली महागडी कार नुकतीच मुंबई बंदरात दाखल झाली. अधिकाऱ्यांनी या कारचा डीलर आणि त्याच्या साथीदारांचा पाठलाग केला. त्यांनी ही कार एका ट्रान्सपोर्ट ट्रकमध्ये भरून अंधेरीच्या शोरूममध्ये विक्रीस ठेवली. रंगेहाथ चोरी पकडल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात गुरग्रामस्थित कार डीलरसह तीन जणांना अटक केली. तसेच अंधेरीच्या शोरूममधून सहा कार ताब्यात घेतल्या.

गेल्या पाच वर्षांत या टोळीने इंग्लंड, जपान आणि संयुक्त अरब अमिरातीतून २० हून अधिक महागडी वाहने राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नावे मागविली. तसेच करचुकवेगिरी करीत सीमा शुल्क विभागाला २५ कोटी रुपयांहून अधिकचा चुना लावला आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या आरटीओमध्ये या गाड्यांची नोंदणी करीत त्या भारतीय ग्राहकांना विकून मोठा नफा कमावल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार दुबईचा रहिवासी असल्याचे कळते. त्याच्यावर चोरीसह इतरही खटले दाखल आहेत.

ज्या अधिकाऱ्यांच्या नावाने ही वाहने आयात करण्यात आली त्यांना त्याबाबत थांगपत्ताच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटक आरोपींत गुरुग्राममधील ‘लक्झरी कार डीलर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निपुण मिगलानी आणि सुरिया अर्जुनन यांचा समावेश असल्याचे कळते.

Web Title: Unique fight to get relief from import duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.