कला-कौशल्यांचे अनोखे फ्युजन
By admin | Published: May 2, 2017 03:45 AM2017-05-02T03:45:00+5:302017-05-02T03:45:00+5:30
कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच दादर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात कलर्स प्रस्तुत आणि लोकमत
मुंबई : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच दादर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात कलर्स प्रस्तुत आणि लोकमत सखी मंच आयोजित, ‘मुंबई बनेगा मंच’ ही नावीन्यपूर्ण स्पर्धा पार पडली. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा पार पडली, हे स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच जनतेने स्पर्धेचा विजेता ठरविला. यात सहभागी स्पर्धकांनी स्वेच्छेने कोणत्याही कलेचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. या स्पर्धेला अॅड. मेघना धैर्यवान आणि प्रा. समीर मयेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी बिग बॉक्सिंग, रांगोळी, तबलावादन, मिमिक्री, मेकअप, शायरी अशा अनेक कला-कौशल्यांचे सादरीकरण स्पर्धकांनी केले. या प्रसंगी, सुमन पिंगळे यांनी हसण्याचे महत्त्व व हसण्याचे लाभ सांगणारी अनोखी ‘हास्य थेरपी’ सादर करून उपस्थितांना खूप हसविले.
कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नावीन्यपूर्ण शोचे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. ‘जब टॅलेंट चलेगा, इंडिया रुकेगा’ ही या शोची टॅगलाइन आहे. एका टॅलेंट शोला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे, सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय. (प्रतिनिधी)
कलाकारांच्या प्रतिभेला पंख
हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मे पासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या अंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये या कार्यक्रमांतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील.
कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे.