मुंबई - खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करुन मुंबईकरांना त्यांच्या कार्यालयात पोहचावे लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मुंबईकरांची लाइफलाईन म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. रेल्वे ठप्प झाली तर मुंबईचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक प्रकल्प सरकारकडून राबविण्यात येतात. याचाच पर्याय म्हणून मेट्रो प्रकल्पांकडे पाहिलं जातं. दिवसाला 80 लाख मुंबईकर लोकलने प्रवास करतात. मात्र त्यातील 20-22 टक्के प्रवासी असे आहेत की त्यांना 6-10 किमी प्रवास करण्यासाठी लोकलचा आधार घ्यावा लागतो.
डेनमार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये रस्त्यावर वाहनांऐवजी सायकल जास्त चालतात. याठिकाणी लोक कामाला जाण्यासाठी सायकलचा वापर करताना दिसतात. मुंबईतही अशाप्रकारे सायकलचा पर्याय लोकांना उपलब्ध करुन द्यावा यासाठी फिरोजा सुरेश यांच्यासारखी सामाजिक सेवक प्रयत्न करत आहेत. फिरोज यांनी सांगितले की, 2023 पर्यंत मुंबईत 1 लाख सायकल प्रवास करण्यासाठी उपलब्ध होणं गरजेचे आहे. स्मार्ट कम्यूट फाऊंडेशनकडून फिरोजा सायकल वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहेत. सायकलच्या वापरामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरचा ताण थोड्या प्रमाणात कमी होईल तर मुंबईकरांचा प्रवास करण्याचा वेळही वाचेल.
मुंबईत सायकलचा वापर करण्यासाठी बीएमसी आणि राज्य सरकारने अनेक उपक्रम आणले. मुंबई महापालिकेनेही काही ठिकाणी सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत. मात्र योग्य नियोजन नसल्याने याचा वापर होताना दिसत नाही. फिरोजा यांनी प्रशासनाला काही उपाय सुचविले आहेत. ज्यात सायकल चालविणाऱ्यांसाठी विशेष प्राधान्य दिलं पाहिजे. अहमदाबाद आणि सुरत येथे सरकारी बसेससाठी वेगळा कॉरिडोर बनविला जातो. मुंबईत ज्याठिकाणी मोठे मोठे दुभाजक तयार केलेत त्याठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात यावे. मेट्रो वनच्या खालील रस्त्यावर सायकल कॉरिडोर बनवू शकतो.
बीएमसीकडून मुंबईत पब्लिक शेयरिंग सायकल योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून सायकल भाड्याने देण्यात येणार आहे. मुंबई सायकल पार्किंगसाठी प्रशासनाकडून अनेक जागा निश्चित केल्या जात आहेत. भविष्यात सायकल पार्किंगसाठी 5 टक्के जागा मुंबई महापालिकेकडून राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो स्टेशनमध्ये सायकल रॅक ठेण्यात येणार आहेत. त्यामुळे सायकल टू वर्क करणे मुंबईकरांसाठी सुलभ होणार आहे.