वैज्ञानिक खेळण्यांचा अनोखा मेळा, उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 03:03 AM2019-05-10T03:03:48+5:302019-05-10T03:04:04+5:30
खेळणी हा सर्वांच्या आनंदाचा विषय आहे. ही खेळणी जर स्वत: बनवलेली असतील तर हा आनंद आणखी द्विगुणित होतो.
मुंबई : खेळणी हा सर्वांच्या आनंदाचा विषय आहे. ही खेळणी जर स्वत: बनवलेली असतील तर हा आनंद आणखी द्विगुणित होतो. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुुरू आहेत, हेच निमित्त साधून उद्यान गणेश मंदिर आणि मराठी विज्ञान परिषदेने शिवाजी पार्क येथे वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन भरविले. यात मुलांनी तयार केलेली खेळणी मांडली असून हे प्रदर्शन लहानग्यांसाठी आकर्षण ठरले.
या प्रदर्शनास विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये मुले आणि पालक मिळून ११0 व्यक्तींनी भिंगार मासा, नयन मट्टक्को, सुतार पक्षी, वर जाणारं फुलपाखरू, तोल सांभाळणारे फुलपाखरू , कागदाची शिट्टी, बाजा, तरंगणारे मॉडेल अशी खेळणी स्वत: हाताने बनवली. या ठिकाणी प्रकाश व चुंबक याविषयी सहा प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
पर्यावरणपूरक कागदापासून तयार करण्यात येणाऱ्या पिशव्यांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. त्याचबरोबर हवेतील दाब, गुरुत्वाकर्षण, घर्षण आदी वैज्ञानिक तत्त्वावर आधारित खेळणी तयार करण्यात आली. स्वयंसेवक ग्रुप-ग्रुपने मुलांना आणि पालकांना खेळणी बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवत होते; त्याप्रमाणे मुले खेळणी तयार करत होते. घर्षण तत्त्वावर आधारित सुतार पक्षी बनवण्यामध्ये मुलांना सर्वाधिक मजा येत होते. मराठी विज्ञान परिषदेतर्फे सुचेता भिडे, चारुशीला जुईकर, अनघा वकटे, केतन शेलार, सुप्रिया कुलकर्णी, अजय दिवेकर, विश्वनाथ म्हाप्रळकर आणि प्रदीप म्हात्रे यांच्यासह रुईया महाविद्यालयातील १0 विद्यार्थ्यांचा समावेश होता.