Join us

राष्ट्रध्वजाप्रती पोलीस कर्मचाऱ्याची अनोखी देशभक्ती

By admin | Published: January 28, 2017 3:10 AM

गुरुवारी देशाचा ६८ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वैभव गायकर / पनवेलगुरुवारी देशाचा ६८ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या, पोशाखावर भारताचा तिरंगा लावला होता. मात्र दुसऱ्या दिवशी हेच झेंडे रस्त्यावर, इतरत्र पडलेले दिसतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी पोलीस नाईक रवींद्र पुरुषोत्तम म्हात्रे हे गेली अनेक वर्षे झेंडे उचलण्याचे काम करीत आहे. देशभक्ती केवळ झेंडे लावून दाखवता येत नाही. रस्त्यावर पडलेले झेंडे उचलून देखील दाखवून शकतो, हे म्हात्रे यांनी दाखवून दिले आहे . रवींद्र म्हात्रे हे २००० मध्ये पोलीस खात्यात दाखल झाले. पोलीस खात्यात दाखल होण्यापूर्वीही म्हात्रे रस्त्यावर पडलेले झेंडे उचलण्याचे काम करीत होते. या देशाची शान असलेल्या तिरंग्याच्या संरक्षणासाठी आपले जवान सीमेवर लढतात, प्रसंगी त्यांना वीरमरणही प्राप्त होते, त्यामुळे कुणीही झेंड्याचा अवमान करू नये, असे आवाहन ते कळकळीने करतात. म्हात्रे सध्या कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. शुक्रवारी नवीन पनवेलमध्ये म्हात्रे यांनी झेंडे उचलण्याची मोहीम राबवली. आठवडाभर कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदी ठिकाणी फेरफटका मारून रस्त्यावर, कचऱ्यात पडलेले झेंडे गोळा करण्याचे काम म्हात्रे करणार आहेत.