पूजाच्या जिद्दीची अनोखी कहाणी

By admin | Published: June 18, 2014 03:21 AM2014-06-18T03:21:30+5:302014-06-18T03:21:30+5:30

आज दहावीचा आॅनलाइन निकाल... सर्वत्र पालक आपल्या पाल्याचा निकाल इंटरनेटवर पाहाण्यात दंग होते....परंतु अलिबागजवळच्या कुरुळ या छोट्याशा गावातील झोपडीवजा घरातील एका मुलीची मोठी घालमेल होत होती.

Unique Story of Pooja | पूजाच्या जिद्दीची अनोखी कहाणी

पूजाच्या जिद्दीची अनोखी कहाणी

Next

जयंत धुळप, अलिबाग
आज दहावीचा आॅनलाइन निकाल... सर्वत्र पालक आपल्या पाल्याचा निकाल इंटरनेटवर पाहाण्यात दंग होते....परंतु अलिबागजवळच्या कुरुळ या छोट्याशा गावातील झोपडीवजा घरातील एका मुलीची मोठी घालमेल होत होती. यशाची खात्री होती मात्र किती टक्के मिळणार याची उत्सुकताही होती. चार वर्षापूर्वी तिचे पितृछत्र हरपले. पण तिने शिकण्याची जिद्द सोडली नव्हती. आईबरोबर आसपासची धुणी-भांडी करुन तब्बल ८६.८0 टक्के गुण मिळवून सर्वांनाच सुखद धक्का दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी पूजाला दुपारी शाळेत बोलावले आणि आॅनलाइन निकाल पाहिला. पूजा जयप्रकाश विश्वकर्मा ८६.८० टक्के जाहीर होताच शाळेत एकच आनंदोत्सव सुरु झाला. मुख्याध्यापिका सुजाता पाटील आणि वर्गशिक्षिका अनुपमा चवरकर यांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले.
अन् पूजाचे शिक्षण सुरू राहिले...
उत्तरप्रदेशातून पूजाचे वडील वीस वर्षांपूर्वी उदरनिर्वाहाकरिता कुरुळला आले होते. चार वर्षापूर्वी त्यांचे आजाराने निधन झाले. पूजा, पूजाचा मोठा भाऊ अनिकेत आणि लहान बहीण अशा तिघांची जबाबदारी आईवर आली. तेव्हा पूजाच्या आईने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तेव्हा मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी तिच्या आईची समजून काढली आणि इथेच राहून पूजाचे शिक्षण सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला.
पूजाच्या आईने लोकांच्या घरची धुणीभांडी करण्याचे काम सुरु केले. तेव्हा पूजानेही साथ दिली. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर ती सहा-आठ घरची धुणी-भांड्यांची कामे करीत होती. मात्र यंदा दहावीचे वर्ष असल्याने पाटील मॅडमने तिला केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आणि तिचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलला. आणि पूजाने देखील आपल्याला लाभलेल्या सहकार्याचे जिद्दीने चीज केले आणि शाळेत आज एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
रायगडमधील एका व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर पूजाच्या यशाचा निकाल टाकून, त्या ग्रुपच्या निर्मात्याने पूजाच्या पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
त्यास तत्काळ मोठा प्रतिसाद मिळाला असून, पूजाच्या ११ वी, १२वीच्या शैक्षणिक वर्षाच्या शैक्षणिक खर्चाचा प्रश्न पूजाला तिची मार्कलिस्ट हातात मिळण्याआधीच सुटला आहे.

Web Title: Unique Story of Pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.