कोरोना काळात कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान करण्यासाठी कल्याणमधील ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू श्रावणी जाधव (14) ही एलीफन्टा ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 कि.मी.चे सागरी अंतर पार करून कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली आहे. विषेश म्हणजे तिने केलेल्या या कामगिरीबद्दल मुंबई महापालिकेच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी देखील तिच्या पाठीवर कौतुकाचा थाप दिली आहे.
कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, स्मशानभूमीतील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, शासकीय सेवेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांनी उल्लेखन्नीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक शब्दाने करता न येण्यासारखे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावणी जाधव हिने 21 फेब्रुवारी 2021 रोजी एलिफन्टा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 कि.मी.चे सागर अंतर कापण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार तिने हे अंतर 3 तास 43 मिनिटांत पोहून पार करून कोरोना योद्ध्यांच्या कामाला मानवंदना दिली आहे.
श्रावणी हि ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू असून तिच्या या उपक्रमास स्विमींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुंबई महापालिकेच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह स्थायी समिती सदस्या सुजाता सानप आणि स्विमींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे किशोर शेट्टी व संतोष पाटील यांनी देखील तिला शुभेच्छा देत तिच्या कामाचे कौतुक केले.