डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनोखे ‘व्हिजन योगा’
By admin | Published: March 31, 2017 06:51 AM2017-03-31T06:51:43+5:302017-03-31T06:51:43+5:30
गेल्या काही वर्षांपासून योगाभ्यासाचे महत्त्व सर्व स्तरांत वाढले आहे. मात्र आता या योगाभ्यासाच्या
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून योगाभ्यासाचे महत्त्व सर्व स्तरांत वाढले आहे. मात्र आता या योगाभ्यासाच्या क्षेत्रात ‘व्हिजन योगा’ या नव्या शाखेने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘व्हिजन योगा’ यात साध्यासोप्या पण अत्यंत प्रभावशाली डोळ्यांच्या व्यायामाचा समावेश आहे. जे योगा प्रकार मेंदूला आराम देतात, डोळ्यांच्या स्नायूंना मजबुती देतात. मुंबईतील विराम अग्रवाल यांनी ‘व्हिजन योगा’ला नवी ओळख दिली आहे.
‘व्हिजन योगा’च्या नियमित सरावाने डोळ्यांसंदर्भातील विविध समस्या दूर होणे शक्य असल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. यात बुब्बुळाचा बिघडलेला आकार, डोळ्यांच्या समायोजन क्षमतेत सुधारणा, डोळ्यांचा नंबर वाढणे - कमी होणे, आळशी डोळा, वृत्तचित्तीय क्षमता, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतरचे उपचार, काचबिंदू, कोरडे डोळे, मोतीबिंदू, नेत्रचेता अपुष्टी, डोळ्यांचा पडदा सरकणे अशा अनेक समस्या दूर होणे शक्य आहे. व्हिजन योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या योगा उपचारांदरम्यान आपल्याला स्वत: निकालांचे मोजमाप करता येते, अशी पुष्टीही विराम अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जगभरातील विविध देशांत डोळ्यांवर करण्यात येणारे उपचार, संशोधन आणि पाँडिचेरी येथील आय स्कूलमधील अभ्यासाच्या आधारे विराम अग्रवाल यांनी ‘व्हिजन योगा’चे मॉड्यूल तयार केले आहे. याअंतर्गत, औषधोपचारांचा वापर न करता विविध टप्प्यांद्वारे डोळ्यांच्या योगांद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. यासंदर्भात अधिक माहिती देताना अग्रवाल म्हणाले की, सन ट्रीटमेंट, आयवॉश, आय रिडिंग टेस्ट, स्ट्रेच आईज् या गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरतात. (प्रतिनिधी)