बहिणीची भावाला अनोखी ओवाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:06 AM2021-08-22T04:06:33+5:302021-08-22T04:06:33+5:30

नितीन जगताप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रक्षाबंधन सण म्हणजे बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण. या दिवशी बहीण आपल्या ...

Unique wave to sister's brother | बहिणीची भावाला अनोखी ओवाळणी

बहिणीची भावाला अनोखी ओवाळणी

Next

नितीन जगताप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रक्षाबंधन सण म्हणजे बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला दीर्घायुष्य लाभावे, त्याने आपले रक्षण करावे याकरिता भावाच्या हातावर राखी बांधते. उल्हासनगरमध्ये रक्षाबंधनाच्या सणाच्या काळातच एका बहिणीने भावाला मूत्रपिंड दान करून नवे आयुष्य दिले आहे.

उल्हासनगर येथील अजय जैस्वानी इम्युनोलॉजिकल आजाराने पीडित होता, त्यासोबत त्याला ग्लोमेरूलोनेफ्रिटिस आजार झाल्याने त्याचे मूत्रपिंड निकामी झाले होते. अशा केसेस विशेषत: या वयोगटातील व्यक्तींमध्ये अंतिम टप्प्यामधील रेनल फेल्युअरच्या १२ टक्क्यांहून कमी प्रमाणात आढळून येतात. रुग्णाचे आरोग्य खालावत जात होते आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहिल्यास त्याच्या जीवाला धोका होता, त्यामुळे प्रत्यारोपण करणे आवश्यक होते.

अजयची बहीण सपनाने (वय ३८ वर्षे) त्याचे जीवन वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. रुग्णाशी बहिणीचे मूत्रपिंड परिपूर्णपणे जुळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट व ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन डॉ. हरेश दोदेजा व त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. एका आठवड्यामध्ये ती बरी होऊन तिच्या नित्यक्रमावर परतली. रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून, कामावर परतला आहे आणि घरातून काम करायला सुरूवात केली आहे.

कठीण काळादरम्यान माझ्या बहिणीने मला मोठा पाठिंबा दिला. ती माझा आधारस्तंभ आहे आणि तिचा निर्धार व आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला खात्री झाली की, मी या आव्हानावर मात करू शकतो. डॉक्टरांनीदेखील आम्हाला खूप आधार दिला आणि दान व प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान आमचे समुपदेशन केले. मी माझे जीवन वाचविणाऱ्या फोर्टिस हॉस्पिटल येथील तज्ज्ञांच्या टीमचे आभार मानतो.

- अजय जैस्वानी, रुग्ण

तरुणांमध्ये किडनी फेल्युअर आजार होणे अकल्पनीय आहे. कारण डायलिसिस किंवा प्रत्यारोपण करावे लागणारे लोक हे मधुमेह व उच्च रक्तदाबाने तसेच वृद्ध काळातील आजारांनी पीडित असतात. या रुग्णाची स्थिती खालावत जात होती, ज्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय उरला होता. मी भावंडांच्या या धैर्याला सलाम करतो. त्यांच्या या पुढाकारामधूनच आम्हाला अशा अवघड प्रसंगी प्रेरणा मिळते, कारण गंभीर रुग्णांसाठी योग्य दाता मिळणे हे अत्यंत कष्टप्रद असते. महामारीच्या प्रादुर्भावापासून अवयव दान करण्यामध्ये घट झाली आहे. लोकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.

- डॉ. हरेश दोदेजा, कन्सल्टिंग नेफ्रोलाजिस्ट व ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन, फोर्टिस हॉस्पिटल

Web Title: Unique wave to sister's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.