Join us  

‘लोकमत’ची अनोखी वेब सीरिज : ‘लालबागच्या राजा’चा प्रवास उलगडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:15 AM

लाडक्या बाप्पाचे आगमन दणक्यात झाले आहे, आता सर्वांनाच ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाची आस लागलेली आहे.

मुंबई : लाडक्या बाप्पाचे आगमन दणक्यात झाले आहे, आता सर्वांनाच ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाची आस लागलेली आहे. अवघ्या मुंबापुरीतच नव्हेतर, जगाच्या कॅनव्हासवर प्रसिद्ध असणा-या ‘राजा’चा प्रवास लवकरच ‘लालबागची जत्रा’ या वेब सीरिजच्या माध्यमातून बाप्पाचा प्रवास उलगडणार आहे. ‘राजा’ला घडविणारे प्रसिद्ध मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी हा प्रवास सर्वांसमोर आणणार आहेत. ‘लोकमत’च्या वेब सीरिजमधून हा प्रवास प्रथमच अनोख्या रीतीने जगासमोर येत आहे.लालबागच्या राजाची स्थापना १९३४मध्ये करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेल्या मार्केटच्या निर्माणासाठी कोळी व अन्य व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला. त्यामुळे १९३४ साली होडी वल्हवणा-या दर्या सारंगाच्या रूपात ‘श्रीं’ची स्थापना झाली. येथूनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्रींची मूर्ती प्रसिद्ध झाली. लालबागच्या राजाचा इतिहास सर्वश्रुत आहेच, परंतु ‘लोकमत’च्या वेब सीरिजमधून गणेशभक्तांना ‘राजा’चा इतिहास, प्रवास आणि संकल्पनांबद्दल नव्याने माहिती मिळणार आहे. एकंदरित, नव्या पिढीचे माध्यम असणाºया सोशल मीडियाद्वारे ‘लालबागच्या राजा’शी नव्याने ओळख करून देणे हा यामागील उद्देश आहे. या वेब सीरिजचे ११ भाग असून, गणेश चतुर्थीपासून प्रत्येक दिवशी एक भाग भक्तांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात ‘मेकिंग आॅफ राजा’, दुस-या भागात ‘पाद्यपूजन’ आणि तिसºया भागात ‘लालबागच्या राजाची भव्यता’ अशा वैविध्यपूर्ण विषयांनी नटलेली ही वेब सीरिज असणार आहे.

टॅग्स :गणेशोत्सव