नालासोपारा (मंगेश कराळे) :- माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीसह मिळून घरफोडीचा बनाव करणाऱ्या फिर्यादीच्या कटाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे.
विशाल नगरच्या संजेरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निकहत असगर खान (३८) यांच्या घरी ९ मे रोजी आरोपीने बंद घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करत बेडरुममधील कपाट व तिजोरीमधील १० लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. माणिकपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाच्या बिल्डींगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेजची पडताळणी करुन आरोपीतांचे फुटेज प्राप्त केले. प्राप्त फुटेज व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीतांची नावे निष्पन्न करुन त्यास अटक करण्याकरीता वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करुन शोध मोहीम सुरु करण्यात आली.
आरोपी मोहम्मद कमर रौफ खान (२८) याला गोवंडी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतुन सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार मित्र नसीम मोईन खान (४०) याचे मदतीने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी नसीम याला फाउंटन हॉटेल, घोडबंदर रोड येथुन ताब्यात घेतले. अटक आरोपीत यांचेकडे तपास केल्यावर फिर्यादी निकहत असगर खान (३८) हीने तिच्या पतीने परदेशातुन वेळोवेळी पाठविलेली रक्कम तिच्याकडुन खर्च झाली होती. पती परत आल्यानंतर खर्च झालेल्या रकमेबाबत काय सांगायचे या विवंचनेत असताना तिने ओळखीचा तिच्या बिल्डींगमध्ये राहणारा नसीम मोईन खान याचेशी संगनमत करुन सदरचा घरफोडी चोरीचा बनाव केला. गुन्हयातील सोन्याचे दागिने हे निकहत यांनी संकेश्वरनगर येथील त्यांचे भावाचे घरी लपवुन ठेवले असल्याची महिती निदर्शनास आली. त्यानुसार गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दा्गिने व रोख रक्कम असा १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, मंगेश चव्हाण, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, महेश पागधरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, संतोष चव्हाण तसेच माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार एस. बी. पाटील, धनंजय चौधरी, श्यामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण, अनिल कांदे यांनी केली आहे.