लोकसभेत एकत्र, आता विधानपरिषदेत वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:08 AM2024-06-04T04:08:55+5:302024-06-04T04:09:15+5:30

महायुतीतील घटक पक्षांनी उभे केले एकमेकांविरोधात उमेदवार  

United in the Lok Sabha, now separate in the Legislative Council, the constituent parties of the Grand Alliance fielded candidates against each other   | लोकसभेत एकत्र, आता विधानपरिषदेत वेगवेगळे

लोकसभेत एकत्र, आता विधानपरिषदेत वेगवेगळे

मुंबई : राज्यात सत्तेत एकत्र असलेले आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढलेले महायुतीतील घटक पक्ष विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहेत. मनसे आणि अजित पवार गटापाठोपाठ भाजपनेही सोमवारी विधानपरिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा केली. तर शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनीही कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याची चिन्हे आहेत. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचा दबदबा असतानाही मनसे आणि अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असताना भाजपने सोमवारी नवी दिल्लीतून विधानपरिषदेच्या तीन उमेदवारांची नावे घोषित केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत म्हणजेच १२  जूनपर्यंत तोडगा निघाला नाही तर महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील. 

अनिल बोरनारे अपक्ष म्हणून रिंगणात 
मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिक्षक नेते आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
तीनवेळा आपल्या नावाचा पक्षाकडून विचार केला गेला. मात्र, या वेळेसही उमेदवारी नाकारण्यात आली आहे, अशा शब्दांत बोरनारे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 
मंगळवारी कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. २०१८ मध्ये बोरनारे यांना उमेदवारी दिली होती. नंतर अचानक त्यांना फॉर्म मागे घेण्यास सांगण्यात आले होते. बोरनारे गेली २५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षक परिषदेत सक्रिय होते. 

विधानपरिषदेसाठी भाजपने जाहीर केलेले उमेदवार
कोकण पदवीधर - निरंजन डावखरे
मुंबई पदवीधर - किरण शेलार 
मुंबई शिक्षक - शिवनाथ दराडे   

उद्धवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल 
उद्धवसेनेतर्फे अनिल परब यांनी मुंबई पदवीधर आणि ज. मो. अभ्यंकर यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या रमेश कीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून रोहन साठाेणे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, शेकाप नेते जयंत पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड,  समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, आमदार अजय चौधरी, सुनील प्रभू, आदी उपस्थित होते. 

Web Title: United in the Lok Sabha, now separate in the Legislative Council, the constituent parties of the Grand Alliance fielded candidates against each other  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.