India Republic Day, Google Doodle : देशभरात आज ७२ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त इंटरनेटच्या महाजालातील सुप्रसिद्ध गुगल या सर्च इंजिननेही एक खास डुडल तयार केलं आहे.
गुगल डुडलच्या माध्यमातून भारतवासीयांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा गुगलकडून देण्यात आल्या आहेत. देशातील विविध सण आणि महत्वाच्या दिवशी गुगलकडून डुडलच्या माध्यमातून सेलिब्रेशन किंवा आदरांजली वाहिली जाते. यावेळीच्या डुडलमध्ये भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, गुगलच्या होमपेजवर झळकणारं हे डुडल एका मुंबईकर तरुणानं तयार केलं आहे.
ओंकार फोंडकर या तरुणानं गुगल डुडल तयार केलं असून त्यानं आपल्या कलाकृतीची दखल गुगलनं घेतली याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन गुगल डुडलच्या माध्यमातून घडविण्याची संधी मला मिळाली यासाठी मी अतिशय आनंदी आणि स्वत:ला भाग्यवान समजतो. भारताच्या विविधतेला एका कॅनव्हासवर रेखाटणं सोपी गोष्ट नाही. यात अनेक गोष्टी आहेत", असं फोंडकर म्हणाला.
डुडलमध्ये नेमकं काय?ओंकारने साकारलेल्या डुडलमध्ये भारतीय कला, क्रीडा, सर्वधर्म समभाव, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडविण्यात आलं आहे. डुडलमध्ये डॉक्टर, विद्यार्थी, कुटुंब, सिनेमा, क्रिकेट, भरतनाट्य, सितार, भांगडा अशा विविध पद्धतीतून अखंड भारताचं दर्शन घडविण्यात आलं आहे.