सत्तेची फळे चाखण्यासाठी सर्वपक्षीयांचा एकोपा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:05 IST2025-02-25T08:05:07+5:302025-02-25T08:05:15+5:30
- नामदेव मोरे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : राज्यात भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असताना मुंबई ...

सत्तेची फळे चाखण्यासाठी सर्वपक्षीयांचा एकोपा
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यात भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकोप्याचे दर्शन घडविले आहे. एपीएमसीची १० हजार कोटींची उलाढाल या सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्यास कारण तर ठरले नसेल ना?
मंत्री गणेश नाईक यांच्या चिठ्ठीमुळे शिंदेसेनेचे प्रभाकर ऊर्फ प्रभू पाटील यांची सभापतिपदावर तर उपसभापतिपदावर हुकुमचंद आमधरे यांची नियुक्ती झाली. सत्ताधारी मित्रपक्षांत खटके उडत असताना त्यांच्यासाेबत विरोधी पक्षही एकत्र आल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. एपीएमसीमध्ये होणारे कोट्यवधींचे व्यवहार पाहता, या ठिकाणी प्रबळ विरोधी गट असावा, ही येथे रोज व्यवहारासाठी येणाऱ्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, गेली अनेक वर्षे ती पूर्ण झालेली नव्हती. यावेळीही ‘आपण सारे भाऊ भाऊ’चेच चित्र समोर आले आहे.
सभापती निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकमत दाखवून काँग्रेसलाही बरोबर घेतल्याचे दिसले. बाजार समितीच्या स्थापनेपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचे संस्थेवर वर्चस्व राहिले आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक वर्षे एकहाती वर्चस्व राहिले आहे. ठाणे जिल्ह्याचे अनेक वेळा पालकमंत्री राहिलेल्या व नवी मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व असतानाही गणेश नाईक यांनी बाजार समितीच्या राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नाही. ठाणे जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची पदे मिळविणाऱ्या शिवसेनेलाही बाजार समितीवर कधीच वर्चस्व मिळविता आले नव्हते.
अजितदादांचे आजारपण आडवे
राज्यात किंवा पवार कुटुंबात काही खटके उडाले, काही घडामोडी घडल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल होतात किंवा आजारी असल्याचे सांगण्यात येते. हाच प्रत्यय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही दिसून आला.
बाजार समिती सभापतिपद अजित पवार गटाकडे राहावे यासाठी संचालकांनी प्रयत्न करून माजी सभापती बाळासाहेब सोळसकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे निश्चित केले होते.
त्यांच्यासाठी मंत्रिमंडळातील काही मंत्रीही आग्रही होते. शेवटच्या क्षणी त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडेही मोर्चेबांधणी सुरू होती.
शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवार चमत्कार घडवतील, असेही बोलले जात होते. परंतु, रविवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार यांच्याशी पदाधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनीही पाटील यांना बिनविरोध सभापती करण्यास पसंती दिली.
मूकसंमतीचे कारण अस्पष्ट
गणेश नाईक यांनीच श्रेष्ठींच्या निर्देशांवरून शिंदेसेनेच्या पारड्यात चिठ्ठीच्या माध्यमातून मत टाकले. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत असतात. परंतु, यावेळी त्यांनीही निवडणूक बिनविरोध होण्यास मूकसंमती का दर्शविली ते स्पष्ट झाले नाही.