मुंबई : महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये लोकशाही शिस्तीचे वातावरण असणे गरजेचे आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करून योजना निर्मितीसाठी सूचना कराव्यात. नवीन भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड स्टडी, शिमला यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील स्वायत्त महाविद्यालयांबाबत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. ते म्हणाले की, आपले शैक्षणिक काम हे बुद्धिमत्ता निर्माण करणारे आहे. शिक्षण म्हणजे माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते. हा विचार खरेच वास्तवामध्ये साध्य होतोय का, याचा विचार आपण केला पाहिजे. स्वायत्त महाविद्यालयांच्या माध्यमातून आदर्श संस्कार विद्यार्थ्यांना मिळतील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून येणारी पिढी आदर्शवत तयार होईल, देशात आपला आदर्श निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बी.के. बिर्ला महाविद्यालयाचे ओ. आर. चितलांगे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड स्टडीचे प्रा. मकरंद परांजपे, डॉ. नरेंद्र चंद्रा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासह स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य तसेच प्राध्यापक या वेळी उपस्थित होते.
विद्यापीठांमध्ये शिस्तीचे वातावरण हवे - राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:12 AM