मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा घोळाचा आणखी एक नमुना म्हणून मास्टर आॅफ कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी देण्यात आली होती. विद्यार्थी संघटनांच्या आक्रमक पावित्र्यानंतर आणि सिनेट सदस्यांच्या कारवाईच्या मागणीनंतर या प्रकरणाची विद्यापीठाकडून चौकशी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयाच्या दोन प्राश्निकांना (पेपर सेटर) सेवेतून कमी करण्याची शिफारस केली असून, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबलिटी या विषयाच्या अध्यक्षाची शिक्षक म्हणून ३ वर्षे मान्यता रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. जे २ प्राश्निक शिक्षक ज्या महाविद्यालयाचे आहेत, त्या महाविद्यालयांना त्या शिक्षकांना सेवेतून तत्काळ कमी करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.मुंबई विद्यापीठाच्या २०१९च्या हिवाळी सत्रातील एमसीए सत्र १ (चॉइस बेस) मधील स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबलिटी या विषयाची परीक्षा दिनांक ११ डिसेंबर, २०१९ रोजी झाली. या परीक्षेतील या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील बरेचसे प्रश्न हे दिनांक २३ मे, २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी मिळते-जुळते आढळले, असा अहवाल एमसीएच्या अभ्यासमंडळाने (बोर्ड आॅफ स्टडीजने) दिल्यानंतर सदरची बाब विद्यापीठाच्या अवैध साधनसामुग्री चौकशी समितीकडे (अफेअर मीन्स इन्क्वायरी कमिटी) पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आली होती. या समितीने दोषींवर कारवाईचा निर्णय दिला आहे. प्रश्नपत्रिका काढणे, निकाल अशा अनेक टप्प्यांवर सातत्याने होणाºया गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका बसतो आहे. विद्यापीठ प्रशासन याबाबत कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याच्या प्रतिक्रिया सिनेट सदस्यांनी व्यक्त केल्या. या घोळाबाबत युवासेनेच्या शिष्टमंडळाने प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.>चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना...मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात, परंतु मागील काही महिन्यांत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या चुकांचा भुर्दंड विद्यार्थी भोगत आहेत, परंतु जे प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी या चुका करीत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.प्रश्नपत्रिकेतील चुकांवर मार्ग काढण्याकरिता परीक्षा मंडळाच्या बैठका होतात. त्यामध्येही विद्यार्थ्यांना समाधानकारक मार्ग निघत नाहीत. त्यामुळे आम्ही विद्यापीठ प्रशासनाने याची जबाबदारी घेऊन प्राध्यापक व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ यांनी दिली.
एमसीए प्रश्नपत्रिकेप्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्यांवर विद्यापीठाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 2:21 AM