‘सह्याद्री बचाव’साठी विद्यापीठही सरसावले

By admin | Published: November 18, 2016 04:16 AM2016-11-18T04:16:24+5:302016-11-18T04:16:24+5:30

सह्याद्रीच्या पर्वतरांगांची दुरवस्था पाहता त्याच्या संरक्षणासाठी तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे.

The University also came forward for 'Sahyadri Rescue' | ‘सह्याद्री बचाव’साठी विद्यापीठही सरसावले

‘सह्याद्री बचाव’साठी विद्यापीठही सरसावले

Next

मुंबई : सह्याद्रीच्या पर्वतरांगांची दुरवस्था पाहता त्याच्या संरक्षणासाठी तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करत सह्याद्री संवर्धन आणि जनजागृती करण्यासाठी सह्याद्री अभियान सुरू करण्यात आले असून अभियानाची सुरुवात ‘ट्रान्स सह्याद्री सायकल रॅली’ने होणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी बुधवारी केली.
अश्वमेध प्रतिष्ठान, सेव्ह अवर सह्याद्री आणि मुंबई विद्यापीठातर्फे ‘सह्याद्री वाचवा अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ या अभियानाचे नॉलेज पार्टनर असणार आहे. या अभियानाची घोषणा बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात करण्यात आली.
१ ते ९ डिसेंबर २०१६ या कालावधीत ‘सह्याद्री बचाव’ अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. नवापूर आणि सावंतवाडी येथून सायकल रॅलीचे दोन गट महाबळेश्वरच्या दिशेने प्रवास करणार आहेत. १२०० किलोमीटर इतका पल्ला सायकल रॅली गाठणार असून या दरम्यान येणाऱ्या गावांमध्ये जाऊन तेथील महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी पथनाट्य आणि पर्यावरण जनजागृतीपर माहितीपट दाखवणार आहेत. या प्रवासात १०१ पथनाट्ये सादर करण्याचे एनएसएसच्या इको क्लबने ठरवले आहे. या सायकल रॅलीची सांगता महाबळेश्वर येथे होणार आहे.
विशेष म्हणजे पुढच्या वर्षी विद्यापीठ १६० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. यानिमित्त सह्याद्री बचाव अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यापीठ सहभाग घेईल, असे देशमुख यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान, बीसीयूडीचे संचालक डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक उल्हास राणे, एनएससचे कार्यक्रम समन्वयक प्रा. बी.एस. बीडवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The University also came forward for 'Sahyadri Rescue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.