४९ हजार ७९६ विद्यार्थी उत्तीर्ण : निकालाची टक्केवारी ९४.५४ %
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या अंतिम वर्षाच्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचा तृतीय वर्ष बीकॉम, सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९४.५४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हा निकाल ९५.७९ टक्के एवढा लागला होता. यंदा ऑनलाइन घेतलेल्या या परीक्षेत ४९ हजार ७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर २,८७८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी ६८ हजार २९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६७ हजार ९७४ विद्यार्थी परीक्षेला बसले.
परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. २०२१च्या उन्हाळी सत्राचे आजपर्यंत ६५ निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तृतीय वर्ष बीएच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, तो निकाल लवकरच जाहीर केला जाईल. तसेच इतरही निकाल वेळेत जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
कोरोनाची साथ असताना मुंबई विद्यापीठाने सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी यशस्वी नियोजन केले आहे. महाविद्यालयांनी ऑनलाइन परीक्षा घेऊन पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे, विद्यापीठाने हे निकाल वेळेत जाहीर केले आहेत.
- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ