उन्हाळी परीक्षांचे इतर निकालही लवकर जाहीर करणार असल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या बी.एस्सी आयटी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९६.५४ टक्के लागला आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
परीक्षेत एकूण सात हजार दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नऊ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी नऊ हजार ६११ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते, तर १६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. २५१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ४१ निकाल जाहीर केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा यंदाही महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षांचे नियोजन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले होते. मे महिन्याच्या २० तारखेला सर्व महत्त्वाच्या शाखांच्या पदवी परीक्षा पूर्ण झाल्या. उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ४१ निकाल जाहीर केले आहेत. मात्र बी.कॉम, बी.ए.सारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे निकाल दीड महिना उलटूनही जाहीर झालेला नाही. यामुळे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या तसेच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
सध्या कर्मचारी संख्या कमी असल्याने निकाल प्रक्रियेचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या कोरोनाच्या नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीचा नियम विद्यापीठात लागू आहे. यातच काही कर्मचारी हे बदलापूर, विरार, वसई अशा भागातून येणारे आहेत. त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे निकालाच्या कामावर परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
पदवी परीक्षांच्या निकालाचे काम सुरू असून, अंतिम सत्राच्या निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. हे निकाल लवकरच जाहीर केले जातील
- डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ