पुरातत्त्व शास्त्रासाठी विद्यापीठ उदासीन
By admin | Published: January 22, 2016 02:29 AM2016-01-22T02:29:48+5:302016-01-22T02:29:48+5:30
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपातील ‘पुरातत्त्व केंद्र’ कार्यरत आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून मुंबई विद्यापीठांतर्गत स्वतंत्र पुरातत्त्व शास्त्र विभाग
स्नेहा मोरे, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपातील ‘पुरातत्त्व केंद्र’ कार्यरत आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून मुंबई विद्यापीठांतर्गत स्वतंत्र पुरातत्त्व शास्त्र विभाग सुरू करण्याबाबतचा बहि:शाल शिक्षण विभागाचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. याविषयी विभागाद्वारे सातत्याने पाठपुरावा करूनही काहीही हालचाल झालेली नाही.
मुंबई विद्यापीठात १९७६ पासून बहि:शाल विभाग सुरू झाला. याअंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, उपयुक्त अभ्यासक्रम आणि सुट्टीतले अभ्यासक्रम शिकविले जातात. या विभागाच्या अखत्यारीत तात्पुरत्या स्वरूपातील पुरातत्त्व केंद्र आहे. या केंद्रासाठीचा निधी पुरेसा नाही, असे बहि:शाल विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक यांचे म्हणणे आहे.
या विभागात प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, स्वतंत्र पुरातत्त्व शास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना या प्रस्तावात होती. मात्र आजतागायत विद्यापीठाकडे हा प्रस्ताव प्रलंबितच आहे. इतिहासाच्या बाबतीत आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठाने पुरातत्त्व या स्वतंत्र विभागाची स्थापना केल्यास विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
अलीकडेच बोरीवली येथील कान्हेरी गुंफांजवळ सात नव्या गुंफा समोर आल्या आहेत. त्या प्रकल्पातील पुढच्या टप्प्यातील कामासाठी साठ्ये महाविद्यालयाच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे अर्ज पाठविण्यात आला आहे. याप्रमाणेच मुंबई आणि परिसरातील अनेक ठिकाणी संशोधन प्रकल्प राबविण्याचा मानस कर्णिक यांनी व्यक्त केला.