लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली ३१ जुलैची डेडलाइन चुकली आहे. पूर्वतयारी न करता आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे ३१जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत नापास झाले आहेत. त्यानंतर कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरल्याने आता कुलगुरू देशमुख यांच्यावर काय कारवाई होणार? त्यांना पद सोडावे लागणार का, याविषयी शैक्षणिक क्षेत्रात चर्चा रंगल्या आहेत.मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा खेळखंडोबा सोमवारीही पाहायला मिळाला. सोमवारी सकाळी सर्व्हर बंद पडल्याने, दीड ते पावणेदोन तास काम ठप्प झाले होते. विद्यापीठाला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. मात्र, शेवटच्या दिवशी सोमवारी केवळ २० अभ्यासक्रमांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत फक्त १७३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. अजूनही ३०४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्याचे आव्हान आहे.सोमवारी एकूण ६३ हजार २३३ उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. यात ३१,८२० उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून ३१,४१३ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. अजूनही २ लाख ९३ हजार ८९४ उत्तरपत्रिका तपासणे बाकी असून त्यासाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू-उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अद्याप विद्यापीठाचे अनेक निकाल आणि लाखो उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही, पण विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन, १ आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.जास्त निकाल जाहीर झाल्याचे दाखवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नवीन शक्कल लढवली आहे. ज्या निकालांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे, असेच निकाल आता विद्यापीठ जाहीर करणार आहे. अन्य निकाल हे राखीव ठेवले आहेत. या निकालांचे काम पुढच्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल.वाणिज्य, विधि आणि कला शाखेचे निकाल अजूनही लागले नसल्याने विद्यार्थी चिंतित आहेत. निकाल राखीव ठेवल्याचे संकेतस्थळावर दाखवत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
विद्यापीठच नापास: मुंबई विद्यापीठाच्या नापास कुलगुरूंचे आता काय होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:40 AM