विद्यापीठाकडे महामानवांसाठी जागा नाही

By admin | Published: July 16, 2014 01:10 AM2014-07-16T01:10:30+5:302014-07-16T01:10:30+5:30

मुंबई विद्यापीठाने गाजावाजा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, गांधी इन पीस, फुले आंबेडकर अध्यासन, बुद्धिस्ट स्टडिज यासारखे अनेक अभ्यासक्रम सुरू केले

The University does not have a place for superannuates | विद्यापीठाकडे महामानवांसाठी जागा नाही

विद्यापीठाकडे महामानवांसाठी जागा नाही

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने गाजावाजा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, गांधी इन पीस, फुले आंबेडकर अध्यासन, बुद्धिस्ट स्टडिज यासारखे अनेक अभ्यासक्रम सुरू केले. परंतु या अभ्यासक्रमांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याऐवजी विद्यापीठाने एका खासगी संस्थेला कलिना कॅम्पसमधील राजीव गांधी सेंटरची अर्धीअधिक इमारत आंदण दिली आहे. या संस्थेसाठी जागा मिळत असताना महामानवांसाठी मात्र विद्यापीठाकडे जागा नसल्याची खंत विद्यापीठ क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे. ही जागा देण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेलाही अंधारात ठेवले आहे.
विद्यापीठाने महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधी इन पीस असे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. महामानवांचे अभ्यासक्रम सुरू असल्याचा टेंभा विद्यापीठ मिरवत असताना या अभ्यासक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स या अभ्यासक्रमासाठी जे.पी. नाईक भवनमध्ये अपुरी जागा देण्यात आली आहे. तसेच या इमारतीमध्ये एमपीएससी सेंटर, महिला विकास कक्षाला प्रत्येकी एक खोली देण्यात आली आहे. अशीच अवस्था फुले आंबेडकर अध्यासनाची आहे. कॉम्प्युटर सायन्स विभागही अधांतरीच असून विद्यापीठाचे आयटी डिपार्टमेंटही आयडॉलच्या इमारतीमध्ये ढकलण्यात आले आहे. गांधी इन पीस हे सेंटरही अशाच चिंचोळ्या जागेत सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे.
मास मीडिया अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ हजारो रुपयांचे शुल्क वसूल करते. पण या विभागाला पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यास विद्यापीठाने वारंवार दुर्लक्ष केले आहे. परंतु एका खासगी संस्थेसोबत राज्यातील प्रश्नांविषयी संशोधन करण्याचा करार विद्यापीठाच्या राजीव गांधी सेंटरने केला आहे. यासाठी राजीव गांधी सेंटरची अर्धी इमारत संस्थेच्या घशात घालण्यात आली आहे तर राजीव गांधी सेंटरला केवळ ४ खोल्या देण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत अनेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाला या प्रश्नावरून धारेवर धरत संस्थेचा करार रद्द करण्याची मागणी केली आहे.
संस्थेने सेंटरबाहेर खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असून सेंटरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असताना संस्थेने खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करत विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसवले आहेत.
विद्यापीठाच्या विविध विभागांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यांना विद्यापीठाने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच विद्यापीठाने उपलब्ध जागेचा योग्य वापर करावा, अशी मागणी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे.
विद्यापीठाने खासगी संस्थेसोबत करार केला नसून विद्यापीठाच्या राजीव गांधी सेंटरने केला आहे. यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याने विद्यापीठाने राजीव गांधी सेंटरकडून आलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. संस्थेने नेमणूक केलेल्या खासगी सुरक्षेबाबत सेंटरकडे विचारणा केली असून सेंटरने अद्याप त्याला उत्तर दिले नसल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The University does not have a place for superannuates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.