विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह नावापुरतेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:59 AM2018-07-28T00:59:02+5:302018-07-28T00:59:32+5:30

उद्घाटनाला सहा महिने उलटले; कर्मचारी, सोयी-सुविधांअभावी वास्तू धूळ खात

University girls' hostels only! | विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह नावापुरतेच!

विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह नावापुरतेच!

Next

- सीमा महांगडे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र सहा महिने उलटूनही तेथे सोयी-सुविधा, कर्मचारी नाहीत. त्यामुळे वसतिगृह मुलींना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे.
युवा सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच कुलगुरूंची भेट घेतली आणि विद्यापीठातील काही समस्यांवर प्रकाश टाकला. या वेळी विद्यापीठातील मादाम कामा वसतिगृहाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आज महाराष्ट्रातून अनेक मुली मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्यासमोर इतर अनेक प्रश्नांसह सुरक्षितपणे राहायचे कुठे, असा मोठा प्रश्न असतो. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विद्यार्थिनींच्या सोयी-सुरक्षेसाठी ही वसतिगृहाची वास्तू उभारली असेल तर अद्याप तेथे काहीच सोयी-सुविधा उपलब्ध का करून दिल्या जात नाहीत, असा सवाल युवासेना सदस्या शीतल शेठ यांनी उपस्थित केला.
रखडलेल्या या वसतिगृहाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करत अनेक वर्षांनी का होईना या वसतिगृहाचे डिजिटल अनावरण करण्यात आले. मात्र, अद्याप तेथे कँटीन, स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास विद्यापीठ प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक विद्यार्थिनींना बसत असल्याचा आरोप शेठ यांनी केला.
विद्यार्थिनींच्या राहण्यासाठी उभारलेली एवढी मोठी वास्तू केवळ विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडून आहे. यापुढे तेथे लवकरात लवकर कर्मचारी आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचेही शेठ यांनी
सांगितले.

सद्य:परिस्थितीत मनुष्यबळ नसल्याने वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. मात्र लवकरात लवकर सर्व सोयी-सुविधा आणि मनुष्यबळासह ते सुरू करण्यात येईल.
- दिनेश कांबळे, कुलसचिव

Web Title: University girls' hostels only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.