Join us

विद्यापीठातील आयडॉलच्या परीक्षांचे कंत्राट टेंडरविनाच; मनविसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 3:38 AM

एजन्सीची हेल्पलाइन विद्यार्थ्यांना ठेवते वेटिंगवर

मुंबई : आयडॉल विभागाच्या ऑनलाइन परीक्षा पार पाडण्यासाठी विद्यापीठाने लिटिल मोर इनोवेशन लॅब या खासगी कंपनीची नेमणूक केली. मात्र महाराष्ट्रात कोणतीही पाळेमुळे नसलेल्या या बंगळुरूस्थित कंपनीला विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांचे कंत्राट टेंडर प्रक्रिया पार न पाडताच दिल्याचा मनविसेचा आरोप आहे. बंगळुरूस्थित या कंपनीची एकच हेल्पलाइन सुरू असून, तीही हिंदी आणि इंग्रजीत सुरू असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी अर्धा अर्धा तास वाट पाहावी लागत असल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी सांगितले.शनिवारी आयडॉलच्या पहिल्या पेपरलाही तांत्रिक अडचणींचा फटका बसला. यामुळे अनेक परीक्षार्थींची परीक्षा हुकली असून ती परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची नामुश्की विद्यापीठ व आयडॉलवर ओढावली आहे. या कंपनीला प्रति विद्यार्थी उत्तरपत्रिकेमागे १९ रुपये इतका फायदा होणार असल्याची माहिती मनविसे शिष्टमंडळाला विद्यापीठ प्रशासनाने दिलीे. राज्यातील अनेक टेक्निकल कंपन्या उत्तरपत्रिका तपासणी आणि आॅनलाइन परीक्षांचे कंत्राट अर्ध्या दरात देण्यास तयार असताना अनुभव नसलेल्या सदर कंपनीला विनाटेंडर काम कसे देण्यात आले, असा प्रश्न मनविसे उपाध्यक्ष संतोष धोत्रे यांनी केला. मात्र व्यवस्थापकीय सिनेट बैठकीतील काही सदस्यांच्या दबावातून आणि अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही प्रक्रिया पार पडल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.परीक्षेच्या पहिल्या दिवशी किती विद्यार्थी बसले? किती विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत? ही माहितीही एजन्सीकडून मिळाली नसल्याची उत्तरे अधिकाºयांकडून मिळत आहेत. यासंबंधी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. दरम्यान, या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी मनविसे शिष्टमंडळाने प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या भेटीची वेळ मागून घेतली आहे.कारवाईची मागणीया कंपनीची चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांना झालेल्या नाहक त्रासासाठी त्यावर कारवाईची मागणी मनविसेने केली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ