विद्यापीठाच्या लॉ आणि सीएसच्या परीक्षा एकाच वेळी; परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:43 AM2019-02-26T05:43:40+5:302019-02-26T05:43:42+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती
मुंबई : लॉ शाखेच्या उन्हाळी सत्रांतील परीक्षांना येत्या मार्चपासून सुरुवात होत आहे. लॉच्या वेगवेगळ्या वर्षाच्या आणि सेमिस्टरच्या या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतील. त्याच दरम्यान १ ते १० जून दरम्यान सीएसच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. एकाच वेळी येणाऱ्या या दोन्ही परीक्षांमुळे लॉच्या काही विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलून त्या लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
उशिरा होणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना सनद मिळण्यास उशीर होईल. निकालांना उशीर होऊन प्रमाणपत्रेही उशिरा मिळतील. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला ब्रेक लागेल, असा आरोप स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केला. तसेच वेळापत्रक बदलण्याची मागणी केली. या संदर्भात विद्यापीठ प्रशासन आणि विभागाचे संचालक विनोद पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
बदल न केल्यास आंदोलनाचा इशारा
कंपनी सेक्रेटरी ही केंद्रीय परीक्षा असल्याने लॉचे अनेक विद्यार्थी ही परीक्षा देतात. दोन्हा परीक्षा एकाच वेळी आल्याने त्यांचा गोंधळ उडेल. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंनाही मेल केले असल्याचे समजते. वेळापत्रकात बदल न केल्यास आंदोलनाचा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलने दिला आहे.