‘आविष्कार संशोधन’ स्पर्धेवर उमटली मुंबई विद्यापीठाची मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:34 AM2019-01-22T01:34:42+5:302019-01-22T01:34:51+5:30
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात पार पडलेल्या १३ व्या आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.
मुंबई : गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात पार पडलेल्या १३ व्या आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. १५ ते १८ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने ५८ गुणांसह आठ सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांची कमाई केली. मुंबई विद्यापीठातर्फे या स्पर्धेत एकूण ४८ संशोधक सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाला मानव्यविद्या, भाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी, मूलभूत शास्त्रे, शेती व पशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले.
संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या कल्पकतेतून आविष्कार आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी, आविष्कार स्पर्धेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया सर्व विजेत्यांचा गौरव
करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
>विद्यार्थ्यांनी संशोधन, नावीन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. संशोधनातून समाजजीवन कसे सुसह्य होऊ शकेल, यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना द्यावी. मला या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे शास्त्रज्ञ पाहायला मिळत आहेत.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ