Join us

मुंबई विद्यापीठ : निकाल न लागल्याने सिनेटची बैठक रद्द, विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:23 AM

बृहत आराखडा मंजूर करून घेण्यासाठी सोमवारी मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली विशेष सिनेटची बैठक आणि प्राधिकरणाच्या बैठका रद्द करण्यात आल्या.

मुंबई : बृहत आराखडा मंजूर करून घेण्यासाठी सोमवारी मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली विशेष सिनेटची बैठक आणि प्राधिकरणाच्या बैठका रद्द करण्यात आल्या. राज्यपालांनी सिनेट बैठकीसाठी परवानगी नाकारल्याने, बृहत आराखडा मंजूर करून घेणे विद्यापीठाला शक्य झाले नाही. विद्यापीठाने सध्या निकालावर लक्ष केंद्रित करावे, अन्य बैठका घेऊ नयेत, असे आदेश राज्यपालांनी दिले. त्यामुळे आता बृहत आराखड्याचे काय होणार? असा प्रश्न पडला आहे, पण आखारडा मंजूर होणार, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.मुंबई विद्यापीठात सध्या निकाल जाहीर करण्याची लगीनघाई सुरू आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले होते. निकालाची डेडलाइन पाळण्यासाठी सक्रिय असणाºया विद्यापीठ प्रशासनाला बृहत आराखड्याच्या डेडलाइनचा विसर पडला. त्यामुळे रविवारी सिनेटसह अन्य बैठका घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता, पण रविवारीही राज्यपालांनी परवानगी न दिल्यामुळे सिनेटची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे आता नवीन वर्षांत सुरू होणारे अभ्यासक्रम, तुकड्यांचे काय होणार, याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. बृहत आराखडा मंजूर करून घेण्यासाठी आता विद्यापीठ काय करते, याकडे लक्ष लागले आहे.४५ दिवसांत निकाल लावण्याचा नियम आहे. परंतु हा नियम पायदळी तुडवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निकालाची डेडलाईन पाळणे महत्त्वाचे असतानाही विद्यापीठाला ती पाळण्यात अपयश आले आहे. अयशस्वी ठरलेल्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी दुपारी राष्टÑवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.निकाल लावण्यात अयशस्वी ठरलेल्या कुलगुरूंच्या निषेधार्थ विद्यार्थी भारती ब्लॅक डे साजरा करणार आहे. विद्यापीठातील मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी भारती काळे कपडे घालून रिबीन बांधून मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयात तसेच मुंबई विद्यापीठात निषेध करणार असल्याचे विद्यार्थी भारती कोकण अध्यक्षा मुंबई मंजिरी धुरी यांनी सांगितले. २ आॅगस्टला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात येईल.राजीनाम्याची मागणी-आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग यशस्वी झाला नाही. राज्यपालांनी दोन वेळा बैठका घेऊनही निकाल जाहीर करण्यात अयशस्वी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. ४५ दिवसांत निकाल लावण्याचा नियम आहे. पण अद्याप निकालजाहीर झालेला नाही, असा आरोप राष्टÑवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी केला. तसेच अयशस्वी ठरलेल्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोमवारी दुपारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते. तरीही ३१ जुलै उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाने फक्त १५३ निकाल जाहीर केलेहोते. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली.कुलगुरू संजय देशमुख यांनी राज्यपालांनी दिलेली डेडलाइन पाळली नाही. यातून त्यांची अकार्यक्षमता दिसून आली आहे. कुलगुरूंचा राजीनामा घ्यायचा अधिकार राज्यपालांनी वापरावा, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. स्टुण्डट फेडरेशन आॅफ इंडियातर्फेही सोमवारी फोर्ट कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.