मुंबई विद्यापीठ : परीक्षांचा घोळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 06:02 AM2018-01-30T06:02:10+5:302018-01-30T06:02:32+5:30
मुंबई विद्यापीठाची एमकॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. गेल्या वर्षी एमकॉमच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला असून १५ गुणांच्या आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. पण सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेमध्ये जय हिंद, भुराणी आणि अन्य काही महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वीच्या पॅटर्नची प्रश्नपत्रिका पाठविली.
मुंबई : मुंबई विद्यापीठाची एमकॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. गेल्या वर्षी एमकॉमच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला असून १५ गुणांच्या आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. पण सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेमध्ये जय हिंद, भुराणी आणि अन्य काही महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वीच्या पॅटर्नची प्रश्नपत्रिका पाठविली. विद्यार्थ्यांनी ही बाब परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. पण विद्यार्थ्यांना तीच प्रश्नपत्रिका सोडवण्यास सांगितली.
मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे निकालांना आणि परीक्षांनाही लेटमार्क लागला. आता पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पण तेथेही विद्यापीठाने गोंधळ घातला आहे. एमकॉम पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्राचा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पेपर होता. नवीन पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना १५ गुणांचे आॅब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात. पण सोमवारी विद्यापीठाने काही ठिकाणी पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत सब्जेक्टिव्ह प्रश्न होते. टिपा लिहा प्रश्नामध्ये ३ पैकी २ टिपा लिहिण्याचा पर्याय होता. नवीन पॅटर्नमध्ये ५ पैकी २ टिपा लिहा असा पर्याय असतो.
एमकॉमच्या अभ्यासक्रमात बदल केलेले नाहीत. पण प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. गेल्या वर्षीपासून हा बदल करण्यात आला आहे. तरीही सोमवारी विद्यार्थ्यांना जुन्या पॅटर्नने प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली नाही. या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी जास्त होती. जुन्या पॅटर्नची प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे नुकसान होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बुधवारी एमकॉमचा दुसरा पेपर आहे. तेव्हा पुन्हा गोंधळ झाल्यास काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
सोमवारी काही ठिकाणी पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेत ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत सब्जेक्टिव्ह प्रश्न होते. टिपा लिहा प्रश्नामध्ये ३ पैकी २ टिपा लिहिण्याचा पर्याय होता. नवीन पॅटर्नमध्ये ५ पैकी २ टिपा लिहा असा पर्याय असतो.
‘विधि’चे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत
मुंबई : मुंबई विद्यापीठाने सर्व निकाल वेळेत जाहीर करणार असल्याचे दिलेले आश्वासन आता फोल ठरताना दिसत आहे. कारण, विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षा होऊन तब्बल ६३ दिवस उलटले असूनही विधि अभ्यासक्रमाचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना निकाल मिळणार कधी? निकाल जाहीर झाल्यावर पुनर्मूल्यांकनाला देणार कधी? त्याचा निकाल कधी जाहीर होणार? असे प्रश्न पुन्हा निर्माण होणार असल्याने विद्यार्थ्यांवरचा ताण वाढला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाच्या (३ वर्षे) दुसºया सत्राची परीक्षा व विधि अभ्यासक्रमाच्या (५ वर्षे) सहाव्या सत्राची परीक्षा विद्यापीठाने घेतली. या परीक्षेला ६३ दिवस झाले आहेत, पण अजूनही विद्यापीठाने निकाल जाहीर केलेला नाही. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे याआधीच नुकसान झाले आहे.
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन तपासणीतील आधीच्या त्रुटी दूर केल्या असून उत्तरपत्रिका तपासणी सुरळीत सुरू असल्याचे सांगितले होते. पण निकाल न लागल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार, परीक्षा झाल्यावर ३० ते ४५ दिवसांत निकाल लागणे आवश्यक आहे. मात्र, आताही विद्यापीठ नियम धाब्यावर बसवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पुन्हा नुकसान होण्याचा धोका आहे.