Join us

मुंबई विद्यापीठात अँटीव्हायरल नॅनो कोटींग्स तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 6:08 PM

पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवरील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकाचे संशोधन 

 

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका संभवतो, त्याचबरोबर कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकिय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी एकत्र येऊन पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी  नॅनो तंत्रज्ञानावर आधारीत अँटीव्हायरल कोटींग्स तयार केली आहेत. विशिष्ट प्रकारच्या पॉलिमर्समध्ये नॅनो पार्टीकल्स बनवून त्याची कोटींग तयार करण्यात आली आहेत.

 

पीपीई कीट आणि मास्कवर जमा होणारे विषाणू नष्ट करण्यासाठी विशिष्ट पॉलिमर्सची गरज भासते. त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणित पॉलिमर्सचाच यात वापर करणे गरजेचे होते. यात कोटींग्स तयार करण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. विशेष बाब म्हणजे ही कोटींग्स अवघ्या चार तासात तयार केली जाऊ शकतात व ती पंधरा मिनीटात वापरात देखील आणली जाऊ शकतात असे निरीक्षणात दिसून आले आहे. विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या या अँटीव्हायरल कोटींग्सची पीपीई कीट आणि एन-९५ मास्कच्या पॉलिमर्सवर याची प्राथमिक चाचणी सुद्धा करण्यात आली आहे.  या कोटींग्सची कोरोना विषाणूंना मारण्याची क्षमता यावर लवकरात लवकर चाचण्या घेण्यात याव्यात यासाठी दोन्ही संशोधक प्रयत्नशील आहेत. देशातील एकमेव बीएसल ३/४ पातळीच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरालॉजी ( National Institute of Virology) पुणे येथे ही कोटींग्स तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प डीएसटीला नुकताच सादर करण्यात आला आहे.  

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि या संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच शैक्षणिक उपक्रमातील हा एक टप्पा आहे. शैक्षणिक क्षेत्रातून जेवढी भरीव मदत करता येईल त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

 - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

 

 

सध्याच्या काळात डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने हे संशोधन केले असून लॉकडाऊनच्या काळात सगळे नियम व्यवस्थित पार पाडून आम्ही या संशोधनाची प्रक्रिया पार पाडली आहे. 

- विश्वनाथ पाटील , प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई