युवा चळवळीतून ग्रामपंचायतीत घडवून आणली दारूबंदी, मुंबई विद्यापीठाने केला कार्याचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:14 AM2019-08-24T11:14:07+5:302019-08-24T11:29:00+5:30

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि समाजामध्ये चांगले परिवर्तन घडवून आणायला हवे, या ध्येयाने पछाडलेली बृन्दाबती साबर.

The University of Mumbai honors the brundabati sabar for liquor ban | युवा चळवळीतून ग्रामपंचायतीत घडवून आणली दारूबंदी, मुंबई विद्यापीठाने केला कार्याचा गौरव

युवा चळवळीतून ग्रामपंचायतीत घडवून आणली दारूबंदी, मुंबई विद्यापीठाने केला कार्याचा गौरव

Next
ठळक मुद्देआपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि समाजामध्ये चांगले परिवर्तन घडवून आणायला हवे, या ध्येयाने पछाडलेली बृन्दाबती साबर. ओरिसातील तब्ब्ल २८ ग्रामपंचायतींत दारूबंदी घडवून आणली. सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

- सीमा महांगडे

मुंबई - ओरिसाच्या एका छोट्याशा खेड्यात राहणारी, अंगयष्टीही साधीच मात्र आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि समाजामध्ये चांगले परिवर्तन घडवून आणायला हवे, या ध्येयाने पछाडलेली बृन्दाबती साबर. तिने सहकाऱ्यांच्या मदतीने ओरिसातील तब्ब्ल २८ ग्रामपंचायतींत दारूबंदी घडवून आणली. शिवाय मनरेगा, स्वच्छ भारत अभियान आणि अनेक युवा गट स्थापन करून, त्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. शुक्रवारी मुंबई विद्यापीठात अनिल काकोडकर, स्नेहलता देशमुख, कुमार केतकर, भरत दाभोळकर अशा मान्यवरांच्या उपस्थितीत तिच्या या कार्याचा सन्मान करण्यात आला.

गांधीजींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्यावरील Gandhi@150 या पुस्तकांचे प्रकाशन मुंबई विद्यापीठात या पुस्तकात लेख लिहिलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसेवेचा वसा घेतलेल्या ओरिसामधील २१ वर्षीय बृन्दाबती साबर हिचा सन्मान करण्यात आला.

२१ वर्षीय बृन्दाबती आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून घरी परतली, तेव्हा तिने दारूबंदी विरोधातील एका बैठकीला हजेरी लावली. तिच्या वडिलांना त्यांच्या मित्रांमुळे लागलेले दारूचे व्यसन आणि त्यामुळे त्यांच्या घराची झालेली वाताहत याचे उदाहरण तिच्या डोळ्यासमोर होते. पुढे याच दारूच्या व्यसनामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी समाजातील इतर कोणाही व्यक्तीवर किंवा त्याच्या कुटुंबावर अशी परिस्थिती ओढावू नये, असा तिने मनाशी ठाम निश्चय केला. दारूबंदीसाठी आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा काढण्यापासून ते लाक्षणिक उपोषण करण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न तिने केले आणि यात तिला यशही मिळाले. जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या मदतीने अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाईही करण्यात आली.

आमचे उद्दिष्ट हे केवळ मद्यविक्री बंद करणे नसून, लोकांना त्यापासून परावृत्त करणे असल्याची प्रतिक्रिया बृन्दाने दिली. यासाठी सहकाऱ्यांच्या माध्यमातून युथ वुमन असोसिएशन, युथ असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून, गावागावांत जनजागृती केली जात असल्याची माहिती तिने दिली. समाजसेवेसाठी गांधीजी देशभर फिरले आणि लोकांच्या सहभागातून त्यांनी नवीन भारत साकारण्याचा प्रयत्न केला. २१ वर्षीय बृन्दाची धडपड त्याच दिशेने असून, युवा पिढीच्या पुढाकारातून नक्कीच गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकारू शकता येईल, अशी प्रतिक्रिया बृन्दाच्या कार्याचा गौरव करताना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळूकर यांनी दिली.

हिच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल

छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या बृन्दाने एवढ्या लहान वयात केलेली कामगिरी स्तुत्य आहे. मुंबईसारख्या शहरातील युवा पिढीनेही याचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा, हिच महात्मा गांधीजींना त्यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त खरी श्रद्धांजली ठरू शकेल.

- स्नेहलता देशमुख, माजी कुलगुरू.
 

Web Title: The University of Mumbai honors the brundabati sabar for liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.