मुंबई : मुंबई विद्यापीठाने ३४ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये ६९ गुणांची कमाई करीत ६ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई केली आणि सर्वसाधारण विजेतेपद पटकावून या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज्च्या माध्यमातून १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान चंदीगड विद्यापीठात या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय युवा महोत्सवात तब्बल १६ वेळा अजिंक्यपद पटकावले आहे.विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकवाद्य संगीत, नाटूकलं, पाश्चात्त्य गायन, पाश्चात्त्य वादन, शास्त्रीय नृत्य आणि कोलाज या सहा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर भारतीय समूह गीत, पाश्चात्त्य समूह गीत आणि मूकनाट्य या तीन स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकावत एकूण ६९ गुणांची कमाई केली आणि स्पर्धेचे विजेते ठरले. चंदीगड विद्यापीठ, चंदीगड येथे आयोजित या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये देशातील १०६ विद्यापीठे राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरली होती.या राष्ट्रीय महोत्सवासाठी एकूण पाच विभागांतून विद्यापीठांची निवड करण्यात आली. प्रत्येक विभागामध्ये संगीत, नृत्य, ललित कला, अभिनय आणि साहित्य या गटातील २७ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेतील गुणानुसार एकूण ३ विद्यापीठे अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. पश्चिम विभागातून मुंबई विद्यापीठाचे एकूण १३ स्पर्धा प्रकार राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यातील ९ स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने पदके मिळविली. तर, थिएटर विभागासाठी सर्वसाधारण चषक पटकावले. अशा प्रकारे सहा सुवर्ण व तीन रौप्यपदके पटकावत त्यांनी विजेतेपदाचा मान मिळविला.समान गुणांमुळे विजेतेपदमुंबई विद्यापीठाप्रमाणेच राजस्थान येथील वनस्थळी विद्यापीठानेही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत ६९ गुणांची कमाई केली. दोन्ही विद्यापीठांना समान गुण मिळाल्याने अखेर या दोघांमध्ये विजेतेपद विभागून देण्यात आले.उज्ज्वल परंपरा कायमकला-सांस्कृतिक क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने केलेल्या देदीप्यमान कामगिरीमुळे देशपातळीवर मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक होत आहे, याचा विशेष आनंद आहे. विद्यापीठाची कला क्षेत्रातील उज्ज्वल परंपरा या विद्यार्थ्यांनी कायम ठेवत ती पुढे नेली आहे.- डॉ. सुहास पेडणेकर,कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
राष्ट्रीय युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाला विजेतेपदाचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:18 AM