मुंबई विद्यापीठ आता एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:54 AM2018-08-25T05:54:26+5:302018-08-25T05:55:13+5:30
मोबाइल अॅपचे उद्घाटन : ६ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा
मुंबई : मुंबई विद्यापीठातील विविध कार्यकम, शैक्षणिक योजना, तसेच परीक्षांचे वेळापत्रक या सर्व बाबी आता महाविद्यालयीन प्राचार्य आणि विद्यार्थ्यांच्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. यासाठी विद्यापीठाने ई-सुविधा नावाचे मोबाइल अॅप सुरू केले असून, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठाशी संलग्नित ७९१ महाविद्यालयांतील ६ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
विद्यार्थी प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतची सर्व सुविधा यावर उपलब्ध असेल. यासाठी १६ अंकांचा पीएनआर क्रमांक विद्यार्थ्यांना पासवर्ड म्हणून देण्यात येईल. हे अॅप विद्यार्थी त्यांच्या पीआरएन क्रमांकाशी जोडून वापरू शकतील. विशेष म्हणजे, हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. दरम्यान, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांसोबत कुलगुरूंनी बैठक घेतली. या वेळी विद्यापीठामधील विद्यानगरी कॅम्पसमध्ये संशोधनासाठी एनक्युबेशन केंद्र स्थापन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
विद्यापीठाची सफर : विद्यापीठाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने फोर्ट आणि कलिना परिसराची व्हर्च्युअल सफर घडविणारी लिंक तयार केली आहे. यामध्ये या दोन्ही ठिकाणांवरील विविध विभागांच्या इमारतींचे फोटो, माहिती मिळेल. ती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.
केरळच्या पूरग्रस्तांना मदत
कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान केरळमधील पूरग्रस्तांना सर्व महाविद्यालयांनी मदत करावी, असे आवाहन केले, तसेच विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांनी एक दिवसाचा पगारही देण्याचे मान्य केले आहे.